कार्यकर्त्यांनो.. आठ ठिकाणी जरा जपून!
By Admin | Updated: September 26, 2015 00:17 IST2015-09-25T22:31:40+5:302015-09-26T00:17:14+5:30
चार वर्षांपूर्वीच ठराव न्यायालय, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या परिसराचा ‘सायलेंट झोन’मध्ये समावेश

कार्यकर्त्यांनो.. आठ ठिकाणी जरा जपून!
सातारा : मिरवणुकीत होणारे ध्वनिप्रदूषण आणि याविषयी होत असलेल्या जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर ‘शांतता क्षेत्र’ (सायलेंट झोन) हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. मात्र, पालिकेने २०११ मध्येच ठरावाद्वारे जाहीर केलेल्या शहरातील आठ शांतता क्षेत्रांची माहिती आजही अनेकांना नसल्याने मिरवणुका, वरातींमध्ये नियमाचे उल्लंघन सर्रास होते.न्यायालयाचा परिसर, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसराचा समावेश शांतता क्षेत्रात करण्यात येतो. त्यानुसार सातारा नगरपालिकेने १२ सप्टेंबर २०११ रोजी ठराव केला असून, त्याअन्वये शहरातील आठ ठिकाणे ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता क्षेत्रांची यादी शहर पोलिसांनी पालिकेकडे मागितल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. अनंत चतुुर्दशीच्या दिवशी शाळांना सुटी असते. शिवाय, मिरवणुका दिवसा सुरू झाल्या तरी रात्रीच मिरवणुकीची रंगत वाढत असते. त्यामुळे शाळांच्या परिसराचा विचार होणे अपेक्षित नसते; मात्र मिरवणूक मार्गावरील रुग्णालयांचा विचार केला जाणे अपेक्षित असते. पालिकेने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांच्या यादीत तीन रुग्णालये, चार शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसर अशा विभागांचा समावेश आहे. या आठ ठिकाणांपासून शंभर मीटरचा परिसर ‘शांतता क्षेत्र’ मानला गेला आहे. हा निर्णय राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडून १४ नोव्हेंबर २००९ रोजी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला असून, ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) अधिनियम २००० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा आदेश देण्यात आला होत. दरम्यान, विसर्जनाच्या यावर्षीच्या प्रस्तावित मार्गावर शांतता क्षेत्रे फारशी येत नसली तरी देवी चौक परिसरातील चिंतामणी, जीवनज्योत, दत्तकाशी तसेच राधिका चित्रपटगृहाशेजारील राधिका नर्सिंग होम ही प्रमुख रुग्णालये या मार्गावर येत असल्याने तेथे खबरदारी बाळगण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
शहरातील या विभागांमध्ये राखा शांतता
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय परिसर, ४६७/८, सदर बझार
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय परिसर, ४६७/१० सदर बझार
आर्यांग्ल रुग्णालय परिसर, शुक्रवार पेठ
प्रतापसिंह हायस्कूल, भवानी पेठ
सैनिक स्कूल, ५९५/१०, सदर बझार
रयत शिक्षण संस्था परिसर, पोवई नाका
रयत शिक्षण संस्था (कल्याणी हायस्कूल, आझाद कॉलेज इ.)
जिल्हा न्यायालय परिसर ५१५,
सदर बझार
ध्वनिप्रदूषण संबंधातील मानके
क्षेत्र दिवसारात्री औद्योगिक७५७०
वाणिज्य६५५५
निवासी५५४५
शांतता५०४०