जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे काम प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:47+5:302021-02-18T05:14:47+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करत आहेत. शैक्षणिक परिवर्तनासाठी जिल्हा परिषद शाळेचा ...

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे काम प्रभावी
वडूज : खटाव तालुक्यातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीतही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करत आहेत. शैक्षणिक परिवर्तनासाठी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक ठामपणे उभा आहे. आजचा शिक्षक शैक्षणिक काम प्रभावीपणे करीत आहे,’ असे गौरवोद्गार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी काढले.
वडूज येथील पंचायत समिती बचत सभागृहात तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती कल्पना खाडे, सभापती मंगेश धुमाळ, सभापती मानसिंग जगदाळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीता कदम उपस्थित होत्या.
यावेळी कबुले म्हणाले, ‘खासगी व इंग्रजी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा खूपच पुढे आहे. ‘श्यामची आई’ हे पुस्तक इंग्रजीत शिकविण्यापेक्षा मराठीतून शिकवले तरच मुलांवर अधिक चांगले संस्कार होतात. जिल्हा परिषद शाळा या शिक्षणाचा पाया असून भावी पिढी घडविण्याचे कार्य येथूनच होत असते. राज्याच्या इतिहासात यूपीएससी व एमपीएससीमधील यशस्वी विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेतीलच आहे.’
गटशिक्षणाधिकारी प्रतीभा भराडे म्हणाल्या, ‘मुलांच्या शिकण्याचे वेगवेगळे मार्ग शोधणाऱ्या माझ्या शिक्षकांसोबत काम करण्यात मी समाधानी आहे. शिक्षकांचा प्रत्येक श्वास घटकातील शेवटच्या विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी राहील. मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. खटाव तालुक्याची शैक्षणिक उंची वाढविण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहोत.’
यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मानसिंग जगदाळे, सुनीता कदम, सुनीता कचरे, माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सभापती जयश्री कदम यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव व अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकरी लक्ष्मण पिसे यांनी आभार मानले.
यावेळी पाच जिल्हास्तरीय, चोवीस तालुकास्तरीय, आदर्श शिक्षक पुरस्कार तर एक आदर्श केंद्रप्रमुख व एक आदर्श विषयतज्ज्ञ शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, कल्पना मोरे, निलादेवी जाधव, धनंजय चव्हाण, हिराचंद पवार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थिती होत्या.
चौकट
शिक्षकांचे कुटुंब भारावले...
पुरस्काराच्या देदीप्यमान सोहळ्याने आपण शिक्षकांच्या कुटुंबातील आहोत, याचा सार्थ अभिमान व्यक्त करीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कुटुंबीयांना आपले आनंदाश्रू लपविता आले नाही.
चौकट
रणरागिणी नियोजनातही अव्वल
गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेल्या प्रतिभा भराडे यांनी प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून सर्वच स्तरातील घटकांना सोबत घेऊन नेटक्या संयोजनाद्वारे दोन वर्षांपूर्वीपासून प्रलंबित राहिलेला हा लक्ष्यवेधी कार्यक्रम यशस्वी करून दाखविल्याने शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले. त्यामुळे नियोजनातही शिक्षण क्षेत्रातील रणरागिणी भराडे यांनी नियोजनातही नंबर वन असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
17वडूज टीचर
वडूज येथे आयोजित गुरुजणांच्या गौरव सोहळ्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उदय कबुले, प्रदीप विधाते, प्रतीभा भराडे उपस्थित होत्या. (छाया : शेखर जाधव)लोकमत न्यूज नेटवर्क