काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:32 IST2018-03-26T00:32:48+5:302018-03-26T00:32:48+5:30

Work is done in 2014; Tender removed 2017! | काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

काम झालं २०१४ मध्ये; निविदा काढली २०१७ ला!

ठळक मुद्देरहिमतपूर पालिकेवर आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सरंक्षक भिंत बांधकामाच्या चौकशीची नगरसेवकाकडून मागणी

रहिमतपूर : ‘रहिमतपूर येथील कुंभारगल्लीमधील कापूर ओढा येथे आरसीसी संरक्षक भिंतीचे काम २०१४ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामाची निविदा दि. ९ मे २०१७ रोजी काढून रहिमतपूर नगरपालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने विकासकामे करीत आहेत. संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी,’ अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्षाचे नगरसेवक नीलेश माने यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिमतपूरमधील कुंभारगल्ली येथील रस्ता सुधारणा करण्याकामी कापूर ओढा येथे आरसीसी सरंक्षक भिंत बांधकाम अंदाजपत्रकीय रक्कम २८.७५ लाख रुपये आहे. या कामाची दि. ९ मे २०१७ रोजी एका जाहिरातीद्वारे ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १९ जून २०१७ रोजी विशेष सभा बोलावून सभागृहामध्ये ती मंजुरीसाठी ठेवण्यात आली. हे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच झालेल्या कामाची निविदा कशी केली? अशी विचारणा केली. यावर नगराध्यक्षांनी या बाबीची चौकशी करून सभागृहास निवेदन करण्याचे आश्वासन दिले.
पुन्हा दि. २७ सप्टेंबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे या विषयाला हरकत घेतली. मागील सभेचा ठराव क्र. ५६ अ. नं.२१ मध्ये वरील काम सर्वानुमते मंजूर असा चुकीचा ठराव लिहिण्यात आला होता, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
नगराध्यक्षांनी या कामाबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्याधिकाºयांना केली. मुख्याधिकाºयांनी ३ आॅक्टोबर २०१७ रोजी या कामाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याबाबतची सूचना कंत्राटी कामगार अबुभाई मुल्ला यांना केली होती. विहित मुदतीत अहवाल सादर न केल्याने संबंधित कंत्राटी कामगारास स्मरणपत्र काढण्यात आले. तरीही अहवाल प्राप्त न झाल्याने मुख्याधिकाºयांनी १ मार्च २०१८ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला.
या अहवालामध्ये २०१४-१५ या आर्थिक वर्षात संबंधित काम पूर्ण झाले असल्याचे म्हटले आहे. त्याच कामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी यांच्याकडून २४ मार्च २०१७ रोजी आदेशाने मिळाल्याचे नमूद केले आहे. संबंधित काम पूर्ण झाल्याचा २०१४-१५ कामाचा ठराव, दि. २१ जुलै २०१६ कामाची प्रशासकीय मंजुरी २४ मार्च २०१७ व कामाची निविदा ९ मे २०१७ अशा उलट्या क्रमाने विकासकामाचे कामकाज करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाला अंधारात ठेवून जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा उद्देश दिसून येत आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती, कंत्राटदार कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश भोसले, रहिमतपूर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय पवार, नानासो माने, नगरसेवक अनिल गायकवाड व माजी नगरसेवक शंकर भोसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Work is done in 2014; Tender removed 2017!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.