मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यांची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST2021-02-05T09:15:53+5:302021-02-05T09:15:53+5:30

पाटण : तालुक्यातील मध्यम प्रकल्प म्हणून मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची कामे गत अनेक वर्षांपासून ...

Work on canals of Morna-Gureghar project stalled | मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यांची कामे रखडली

मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्यांची कामे रखडली

पाटण : तालुक्यातील मध्यम प्रकल्प म्हणून मोरणा-गुरेघर प्रकल्पाकडे पाहिले जाते. मात्र, या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची कामे गत अनेक वर्षांपासून रखडली आहेत. या प्रकल्पावर नेमणूक असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सतत बदल्या आणि वेगवेगळे ठेकेदार यामुळे आजपर्यंत या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही.

दरम्यान, गत चार वर्षांपासून संबंधित अधिकाऱ्यांना कालव्याच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे अशा सर्व शक्यतांचा विचार केल्यास प्रकल्पाच्या कालव्यांची कामे पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाटण तालुक्यात तारळी तसेच मोरणा-गुरेघर, वांग-मराठवाडी, उत्तरमांड असे अनेक मोठे मध्यम प्रकल्प शासनाने बांधून शेतकऱ्यांना तसेच शेतीला पाणी पुरवण्यासाठी एक मोठी क्रांती केली आहे. परंतु या क्रांतिकारक योजनेचा लाभ गेल्या तीस वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. याचे कारणही तसेच आहे. गत अनेक वर्षांच्या कालखंडात कधी निधी नाही तर कधी जलसंपदा तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तत्कालीन अधिकाºयांनी केलेले कामातील घोटाळे, हलगर्जीपणा याचा गैरफायदा घेऊन कंत्राटदारांनी अर्धवट कामे सोडून शासनाला चुना लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच आजअखेर शेतकऱ्यांना धरणातील पाण्याचा लाभ घेता आलेला नाही.

मोरणा-गुरेघर प्रकल्पाबाबत विचार केला तर धरणाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. धरणात पाणीसाठा आहे. मात्र, तो फक्त डोळ्यांनी पाहण्यापुरता उरला आहे. कारण मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन कालव्यांची कामे यापूर्वी नेमलेले ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी अर्धवट ठेवलेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही कालव्यांसाठी शासनाने जवळपास ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीसुद्धा कालव्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. हे दोन्ही कालवे पूर्ण झाले असते तर मोरणा-गुरेघर प्रकल्पापासून कऱ्हाड तालुक्यातील साजूर गावापर्यंतची शेकडो गावे आणि तेथील शेतीजमीन सुजलाम् सुफलाम् झाली असती. मात्र, गत ३० ते ३५ वर्षांपासून शासनाने दिलेल्या निधीत गोलमाल आणि ठेकेदार व अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा दिसून आल्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण होईनात.

- चौकट

साजूरपर्यंतची शेती येणार पाण्याखाली

पाटण तालुक्यातील गोकुळतर्फे पाटण, आंब्रग, पेठशिवापूर, मोरगिरी, कोकीसरे, मानगाववाडी, कोतावडे, आडदेव, कुसरुंड, नाटोशी, चोपडी, बेलवडे, सुळेवाडी, गव्हाणवाडी, पापर्डे, सांगवड तसेच कऱ्हाड तालुक्यातील साजूर अशा अनेक गावांतील शेतजमिनी मोरणा प्रकल्पाच्या पाण्यामुळे ओलिताखाली येणार आहेत. मात्र, ते कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. एक तप पूर्ण होऊन गेले तरी प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीत आले नाही.

- चौकट

भूसंपादनाचे कामच उरकेना!

सध्या कालव्याच्या कामांचे काय चालले आहे याचा आढावा घेतला असता संबंधित अधिकारी म्हणतात की, अजूनही भूसंपादनाची कामे सुरू आहेत. आणि लॉकडाऊनमुळे मोरणा-गुरेघर प्रकल्पाच्या कालव्याची कामे बंद आहेत. शासनाने कालव्यांच्या कामासाठी पैसे दिले आहेत. मात्र, भूसंपादनाचे काम उरकेना, अशी अप्रत्यक्ष कबुली कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- चौकट

साताऱ्यातून वरिष्ठ अधिकारी पाहताहेत मजा

पाटण तालुक्यातील मध्यम प्रकल्पाची कामे करण्याची जबाबदारी आणि त्यावर नियंत्रण तसेच कामातील दर्जेदारपणा व अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम साताऱ्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयातून होत असते. पाटणला मध्यम प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी एखादा अधिकारी धाडला जातो. आणि आपण मात्र साताºयात बसून मजा बघायची, अशा प्रकारामुळे आजपर्यंत तारळी असो किंवा मोरणा-गुरेघर या प्रकल्पांच्या कामाची अन् कालव्यांच्या कामाची वाट लागली आहे.

- कोट

मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांची बंद पडलेली कामे लवकरच सुरू होतील. मध्यंतरी कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन होते. त्यामुळे काहीच करता आले नाही. कामे बंद राहिली तसेच आता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या कालव्याच्या कामांना निधी आहे. परंतु कामे बंद आहेत.

- एस. एस. खरात, सहायक अभियंता

कृष्णा खोरे विकास महामंडळ

Web Title: Work on canals of Morna-Gureghar project stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.