चांद नदीवरील पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:59+5:302021-02-05T09:10:59+5:30

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम ...

Work on the bridge over the Chand River continues on a war footing | चांद नदीवरील पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू

चांद नदीवरील पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या महिन्याभरात हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय व वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत होती. मात्र, गेली कित्येक वर्षे विविध कारणांमुळे हे काम रखडले जात होते. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर जि. सोलापूर यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. मायणीपासून पंढरपूरपर्यंत सुमारे शंभर किलोमीटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

याच कामादरम्यान सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मायणीकडे पाहिले जाते. पूर्वी बाजारपेठेतून जाणारा मार्ग अतिशय अरुंद असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. तासन्‌ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरण कामादरम्यान रुंदीकरणाकडे सर्वांचे लक्ष गेल्या वर्षभरापासून लागून राहिले होते. अखेर संपूर्ण गावाच्या पेठेतून काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूस नदीचे पात्र आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे या नदीपात्रातील पुलाचे काम सतत रखडत होते, तसेच पर्यायी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला मातीपूलही दोन ते तीन वेळा वाहून गेल्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार, याकडे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व वारकरी संप्रदायांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गेल्या दोन महिन्यापासून नदीपात्रातील पाणी पातळी पूर्ण कमी झाल्याने या दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, येत्या महिन्याभरात नदीपात्रातील मायणी गावाच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी ते खुले होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट -

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्ग रुंदीकरणातील पहिला टप्पा मायणी ते पंढरपूर सुमारे शंभर किलोमीटर अंतर रुंदीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. मात्र, मायणीपासून मल्हारपेठकडे जाणाऱ्या सुमारे साठ किलोमीटर अंतराचे रुंदीकरण कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आजही कायम आहे.

०३मायणी

मायणी येथील चांद नदीपात्रातील पुलाचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (छाया : संदीप कुंभार)

Web Title: Work on the bridge over the Chand River continues on a war footing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.