‘लल्लन बॉईज’नी पाळला शब्द... ‘लोकमत’ने ऊर्मी दिली
By Admin | Updated: September 16, 2014 23:45 IST2014-09-16T22:26:31+5:302014-09-16T23:45:30+5:30
तरूणाई सरसावली : बोलेमामांच्या कुटुंबीयांना दिला मदतीचा हात

‘लल्लन बॉईज’नी पाळला शब्द... ‘लोकमत’ने ऊर्मी दिली
सातारा : ‘भविष्यात विधायक सामाजिक कार्य करून युवांसाठी मार्गदर्शक काम करू’ असा ‘लोकमत’ला लल्लन बॉईजने दिलेला शब्द आज पाळला. बोलेमामांच्या कुटुंबीयांना या मुलांनी आर्थिक मदत दिली आहे.गणपती विसर्जन मिरवणुकीत भिंत कोसळून त्याखाली बोलेमामा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांची वडापावची गाडीही पूर्णपणे खराब झाली. बोलेमामांच्या चारही मुलींनी त्यांच्या पश्चात ही गाडी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी ‘लोकमत’ने सातारकरांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील लल्लन बॉईज ग्रुपने बोलेमामांना मदत करण्याचे ठरविले. प्रत्येकाने दोन दिवसांचा खर्च बोले कुटुंबीयांना द्यायचा असे ठरविले. त्यानुसार ग्रुपच्या अजय जाधव, शैलेश देशमुख, विपुल कारंडे, सुदर्शन घाडगे, अब्दुल सय्यद, वैभव कुलकर्णी, विश्वजित शिंदे, शिवराज हेगडे, शुभम कांबळे आणि शुभम शिंदे यांनी निधी जमा करून तो बोले कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. (प्रतिनिधी)
लल्लन बॉईज हे नाव वाईट अर्थाने चर्चेत येत असताना ‘लोकमत’ने आम्हाला चांगले करून दाखविण्याची ऊर्मी दिली. अशीच कामे भविष्यात करत राहू.
- अजय जाधव
भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनीही बोले मामांच्या कुटुंबीयांना साडेबारा हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.
इनिशिएटिव्ह