स्वच्छ पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:17+5:302021-09-04T04:46:17+5:30
पाटण : गेल्या दीड महिन्यापासून कोयनानगर येथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

स्वच्छ पाण्यासाठी महिलांचा आक्रोश मोर्चा
पाटण : गेल्या दीड महिन्यापासून कोयनानगर येथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साथरोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, या मागणीसाठी कोयनानगरमधील महिलांनी कोयना प्रकल्पाच्या सिंचन कार्यालयावर धडक मोर्चा काढला व तेथेच ठिय्या मांडला.
कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांना निवेदनही देण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून कोयनानगरला पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलावर्गाला तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने पाटण तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोयना प्रकल्पाच्या कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढला. ‘कोयनानगरला स्वच्छ पाणीपुरवठा झालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, धरण आहे उशाला कोरड पडली घशाला,’ अशा महिलांनी दिलेल्या अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा थेट कोयना प्रकल्पाचे अभियंते नितेश पोतदार यांच्या कार्यालयासमोर गेल्यानंतर त्याठिकाणी महिलांनी जागेवरच ठिय्या मांडला.
यावेळी कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांनी अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे सर्वच ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. अद्याप हे पाणी का गढूळ आहे, याचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकर स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या महिला शांत झाल्या. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनही महिलांनी पोतदार यांच्याकडे सादर केले.