‘एकटीचा अनुभव’ सांगण्यासाठी महिला सरसावल्या!
By Admin | Updated: January 19, 2015 00:20 IST2015-01-18T22:39:07+5:302015-01-19T00:20:29+5:30
‘स्टिंग आॅपरेशन’चे भरभरुन स्वागत : रात्रीच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र भावना प्रकटल्या

‘एकटीचा अनुभव’ सांगण्यासाठी महिला सरसावल्या!
सातारा : माहुली परिसरात एका अभागी महिलेवर सामूहिक अत्याचारानंतर तिचा खून झाला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी मध्यरात्री तीन ठिकाणी धाडसी स्टिंग आॅपरेशन केले. या आॅपरेशनमुळे समाजातील काही विकृत प्रवृत्ती चव्हाट्यावर आली. या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांचे धाडस वाढले असून आजवर गप्प बसलेल्या महिला बोलायला लागल्या आहेत.शहरातील मुख्य बसस्थानक, क्रीडा संकुल, जिल्हा परिषद, गोडोली नाका आणि भूविकास बँक परिसरात ‘लोकमत’ ने शुक्रवारी रात्री ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. ज्या सातारकरांच्या विश्वासार्हतेच्या शपथा घेतल्या जात होत्या, त्या शहरातील सामाजिक स्वास्थ्य किती बिघडले आहे, हे या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. रात्री दहानंतर महिला किती असुरक्षित आहेत, ही यामुळे उघडकीस आले.सातारा शहराबरोबरच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथेही एकाच वेळी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. प्रत्येक ठिकाणचा अनुभव कमीअधिक प्रमाणात सारखाच होता. यामुळे आदर्शवादाच्या गप्पा मारणाऱ्या समाजाचे दुसरे चित्रहीसमोर आले. हाच अनुभव समाजातील अनेक महिलांना यापूर्वी आला. ‘लोकमत’ केलेल्या धाडसाचे दिवसभर विविध स्तरातून कौतुक होत होते. त्याचप्रमाणे ही बातमी आवर्जून वाचण्यास मैत्रिणींना सांगितले जात होते. त्याचप्रमाणे या बातमीची पोस्ट व्हॉट्सअॅपवरून विविध गु्रपवरून फिरवल्या जात होत्या. (प्रतिनिधी)
परगावाहून कधी रात्री उशिरा येण्याचा योग आलाच तर नऊनंतर कधीही एकटी घरी जाऊ शकत नव्हती. अनेकदा वाईट अनुभव आले. त्यामुळे घरी फोन करून कुटुंबीयांना बोलावून घेत होते. नातेवाईक येईपर्यंत बसस्थानकातच थांबावे लागत होते.
- यामिनी जोशी,
एसटीचे तत्कालीन अधिकारी
रात्रीच्या वेळी महिला सातारा शहरात सुरक्षित नाहीत, ही वस्तुस्थिती ‘लोकमत’ने धाडसाने मांडली. महिलांच्या मनातील ही भावना ‘लोकमत’ने पुढे आणल्यामुळे अनेक ठिकाणी सुधारणा होणे अपेक्षित आहे. पुरुषांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
- सरिता बाबर, सातारा
सातारा महिलांसाठी सुरक्षित आहे हा फुगा ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे फोडला. यात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींचा अनुभव शहरातील महिलांनी घेतला आहे. पण अब्रू जाईल या भीतीने त्या पुढे येत नव्हत्या. महिला अशा मानसिकते विरोधात आवाज उठविला पाहिजे.
- चारुशीला मोहिते, सातारा
एसटी स्टँड तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना विशेषत: मुलींना होणारा त्रास ही बाब नित्याचीच होत चालली आहे. ‘लोकमत’ने हेल्पलाईन सुरू करून सर्व महिला वर्गाला एक प्रकारे आधार देण्याचे काम केले आहे.
- संध्या जोशी,
अभिनव महिला मंडळ अध्यक्षा , खटाव
मी नोकरी करते, तसेच माझ्यासारख्या असंख्य महिला रोज नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्या सर्वांच्या कुटुंबीयांना त्या घरी पोहोचेपर्यंत लागणारी काळजी पाहता आज समाजात महिला सुरक्षित आहेत का,असा प्रश्न नेहमी येतो.
- प्रा. वहिदा इनामदार,
खातगुण