शिरवळजवळ टेम्पोखाली चिरडून महिला ठार

By Admin | Updated: November 7, 2015 23:41 IST2015-11-07T23:10:09+5:302015-11-07T23:41:02+5:30

चार जखमी : महामार्गालगत वाहनांची वाट पाहत थांबणे बेतले जिवावर

The women were killed in a tempo near the Shirval and killed | शिरवळजवळ टेम्पोखाली चिरडून महिला ठार

शिरवळजवळ टेम्पोखाली चिरडून महिला ठार

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ हद्दीत मालट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर कलंडलेल्या टेम्पोखाली महामार्गाच्या कडेला वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिला प्रवासी चिरडल्या गेल्या. या विचित्र अपघातात एक महिला जागीच ठार असून, चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पारगाव खंडाळा येथे वर्षापूर्वी झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती शिरवळमध्ये झाली.
घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौपाळा, शिरवळ येथील एका कंपनीत कामावर जाण्यासाठी शिरवळ येथील अलका यशवंत गुंजवटे, बिना हरिदास बाला, नीता प्रकाश यादव, सरला प्रभाकर कोळी, सुवर्णा कृष्णदेव भणगे या पाच महिला शिरवळ पोलीस स्टेशनसमोर महामार्गावर वाहनांची वाट पाहत थांबलेल्या होत्या.
यावेळी संबंधित महिलांनी हात केल्याने कोल्हापूर बाजूकडे निघालेल्या टेम्पोचा (एमएच ११ एएल ६५२) चालक विकास दुरेकर (३२, रा. फुरसुंगी, ता. हवेली) याने टेम्पोचा वेग कमी केला. दरम्यान, पुण्याहून सातारा बाजूकडे भरधाव निघालेल्या मालट्रकने (एमएच ११ एम ६००७) टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो महामार्गावर उलटल्याने सुमारे पन्नास ते साठ फुटांवर फरफटत जाऊन महामार्गावर थांबलेल्या महिलांंच्या अंगावर गेला.
यामध्ये अलका गुंजवटे व सरला कोळी प्रसंगावधान दाखवत बाजूला पळत असताना पडल्याने जखमी झाल्या, तर बिना बाला, नीता यादव, सुवर्णा भणगे या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा कृष्णदेव भणगे (वय ३५, रा. मूळगाव आसगाव, ता. सातारा, सध्या रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रकचालक तानाजी प्रल्हाद यादव (३६, रा. अतिट ता. सातारा) याला पंढरपूर फाटा येथे शिरवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले. गंभीर जखमींना स्थानिकाच्या मदतीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, हवालदार चंद्रकांत निकम तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण
महामार्गावर थांबलेल्या पंधरा वाहनांवर काही दिवसांपूर्वीच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. या अपघातामुळे साधारणत: वर्षापूर्वी पारगाव-खंडाळा येथे कंटेनर उलटून आठजणांना जीव गमवावा लागला होता. त्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
अनर्थ टळला
अपघातस्थळापासून सुमारे शंभर फुटांवर सातारा व इतर ठिकाणी जाण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांची वाट पाहत बसलेले असतात. हा अपघात थोडा पुढे झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
 

 

Web Title: The women were killed in a tempo near the Shirval and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.