खासगी बस उलटून महिला ठार
By Admin | Updated: January 23, 2015 23:43 IST2015-01-23T23:17:54+5:302015-01-23T23:43:48+5:30
१८ प्रवासी जखमी : फळणीजवळील दुर्घटना; जखमींमध्ये इस्लामपूर, बांबवडे येथील महिलांचा समावेश

खासगी बस उलटून महिला ठार
सातारा : जावळी तालुक्यातील फळणी गावच्या हद्दीत असणाऱ्या आपटीच्या वळणावर भाविकांना घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार, तर १७ महिला आणि एक असे १८ जण जखमी झाले. मृत आणि १६ जखमी वाळवा आणि इस्लामपूर तालुक्यातील, तर दोन जखमी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आहेत.
राणी उमेश करे (रा. धनगर गल्ली, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव असून, सर्व जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पाच ते सहा महिला गंभीर आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चालक भूषण बापूराव पाटील (रा. इस्लामपूर) याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.याबाबत जिल्हा रुग्णालय आणि मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील तीसहून अधिक महिला आणि सहा ते सात लहान मुले गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठामध्ये गणेश दर्शनासाठी शुक्रवारी पहाटे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसने (एमएच ११ टी ९६९६) निघाल्या होत्या.
सकाळी पावणेआठ वाजता बस फळणी गावच्या हद्दीत आली. आपटी गावाजवळच्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. बहुतांश प्रवासी झोपेत होते. बस उलटल्याने एकच गोंधळ उडाला आणि जोराचा आक्रोश सुरू
झाला. या घटनेत राणी करे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अठराजण जखमी झाले.
अठरा जखमींपैकी इंदूबाई जालिंदर गवंडी (वय ५०), ओमकार उमेश करे (१४), धोंडूबाई सयाप्पा शेडगे (६५), शकूबाई बाबा कोळेकर (५८), धोंडूबाई बाबा कोळेकर (६२), यशोदा बाबू गवंडी (३८), रेखा उत्तम कोळेकर (३०), आरती रामचंद्र कोळेकर (१९), पार्वती वसंत बंडगर (५२), कमल संभाजी ढोबळे (६०), राधाबाई शिवाजी माने (५०), कोमल शामराव ताटे (१८), बाळाबाई संभाजी कोळेकर (४०, रा. अहिल्यादेवी नगर, इस्लामपूर), मालन विठ्ठल करे (५०), साखरु रामचंद्र कोळेकर (४०) हे सोळाजण इस्लामपूरचे, तर धनश्री आनंदा जानकर (१३), बाळाबाई तुकाराम जानकर (६०) या बांबवडे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील आहेत. (प्रतिनिधी)
दर्शन तर झालेच नाही..!
इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.
दर्शन तर झालेच नाही..!
इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.