महिलेला जाळून मारणाऱ्यास जन्मठेप

By Admin | Updated: April 23, 2016 00:43 IST2016-04-22T21:20:49+5:302016-04-23T00:43:25+5:30

दहा हजारांचा दंड : फलटण तालुक्यातील आलगुडेवाडीत घडली होती घटना

The woman who burns the woman's life | महिलेला जाळून मारणाऱ्यास जन्मठेप

महिलेला जाळून मारणाऱ्यास जन्मठेप

सातारा : उसने दिलेले पैसे आणि दागिने परत मागितल्याने चिडून महिलेला जाळून मारल्याप्रकरणी सातारा न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
लाला बाबालाल आतार (वय ४५, रा. धुळदेव, ता. फलटण) असे आरोपीचे नाव आहे. कलाबाई पोपट मोहिते (वय ३५, रा. आलगुडेवाडी, ता. फलटण) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांनी आतार याला कानातील सोन्याची फुले, झुबे आणि १५ हजार रुपये उसने दिले होते. पोपट कर्चे यांच्या घरात त्या भाड्याने राहत असत. दि. ४ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री दीडच्या सुमारास आतार हा कलाबाई मोहिते यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांनी उसने दिलेले पैसे आणि दागिने त्याला परत मागितले. त्यामुळे चिडलेल्या आतार याने तिला हाताने व चपलेने मारहाण केली. तसेच तिच्याच घरातील कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले, असा आरोप आतारवर ठेवण्यात आला होता.
गंभीर जखमी अवस्थेत कलाबाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऐंशी टक्के भाजलेल्या कलाबाईंचा दि. ६ आॅक्टोबर २०१४ रोजी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांनीच फिर्याद दिली होती. तसेच, मृत्यूपूर्व जबाबात घटनेची हकीगतही सांगितली होती. फलटण शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. व्ही. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आतार यास जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम मृत कलाबाई मोहिते यांचा मुलगा आकाश याला भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पेहरवी विभागाचे फौजदार अविनाश पवार, हवालदार अरुण राजे, अविनाश पवार, नंदा झांजुर्णे, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, सुनील सावंत यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

मुलाची साक्ष महत्त्वाची
खटल्यादरम्यान अनेक साक्षीदारांना फितूर घोषित करण्यात आले. मात्र, कलाबाई मोहिते यांचा १३ वर्षांचा मुलगा आकाश याची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच वैद्यकीय अधिकारी अनिल कदम, डॉ. सचिन विभुते, तत्कालीन नायब तहसीलदार गणेश भोसले आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

Web Title: The woman who burns the woman's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.