ढोकावळे येथील भूस्खलनामध्ये जखमी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:52+5:302021-09-14T04:45:52+5:30
कोयनानगर : अतिवृष्टीमुळे भूस्खलनात जखमी झालेल्या पाटण तालुक्यातील ढोकावळे येथील वृद्धा वैशाली विठ्ठल वाडेकर (वय ६०) यांचा रविवारी मृत्यू ...

ढोकावळे येथील भूस्खलनामध्ये जखमी महिलेचा मृत्यू
कोयनानगर : अतिवृष्टीमुळे भूस्खलनात जखमी झालेल्या पाटण तालुक्यातील ढोकावळे येथील वृद्धा वैशाली विठ्ठल वाडेकर (वय ६०) यांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे ढोकावळे गावातील मृतांची संख्या पाच झाली आहे, तर कोयना विभागात बळींचा आकडा सतरावर पोहोचला आहे.
पाटण तालुक्यात २२ व २३ जुलैला कोयना विभागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने कोयना विभागात अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन विभागातील मिरगाव, हुंबरळीसह ढोकावळे या गावात जीवितहानी झाली होती. या भूस्खलनामध्ये ढोकावळे येथील चारजणांना प्राण गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले होते. उपचार घेऊन परत निवारागृहात आलेल्या वैशाली विठ्ठल वाडेकर या जखमी महिलेचे उपचार सुरू असताना निवारा केंद्रात निधन झाले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली विठ्ठल वाडेकर यांच्यावर सुरुवातीला पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना चाफेर-मिरगाव हायस्कूलमध्ये स्थलांतरित ठिकाणी आणण्यात आले. या ठिकाणी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपचार सुरू होते. मात्र, दोन दिवसांपासून प्रकृती खालावल्यानंतर आरोग्य केंद्रास कल्पना देऊनही कोणीही आले नाही त्यातच त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
चौकट :
वैशाली वाडेकर यांचा मृत्यू भूस्खलनामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्या वारसाला शासकीय निकषाप्रमाणे आर्थिक मदत मिळावी.
- ॲड. वर्षा देशपांडे
लेक लाडकी अभियान प्रवर्तक