स्वातंत्र्यलढ्याचा ‘साक्षीदार’ आता नव्या जागी
By Admin | Updated: May 14, 2015 23:55 IST2015-05-14T22:51:30+5:302015-05-14T23:55:03+5:30
स्मृतिस्तंभासाठी कठड्याचे बांधकाम : जुन्या स्मृतिस्तंभाचे नव्या जागी स्थलांतर

स्वातंत्र्यलढ्याचा ‘साक्षीदार’ आता नव्या जागी
कऱ्हाड : स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आता नव्या जागी परत येणार आहे. मार्केटयार्ड येथील तहसील कार्यालय आवारात जुना स्मृतिस्तंभ तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात येणार आहे. स्मृतिस्तंभ बसवण्यासाठी लागणाऱ्या कठड्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी स्मृतिस्तंभ बसवून, तो नागरिकांना पाहता येणार आहे.
महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा देत देशभर मोर्चा काढला. गांधी यांनी काढलेल्या मोर्चामध्ये लाखो संख्येने स्वयंसेवकांनी तसेच देशप्रेमींनी सहभाग घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणही गमावले. या ‘चले जाव’ मोर्चाच्या स्मृती कायम राहाव्यात, यासाठी शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी स्मृतिस्तंभ उभारण्यात आले. येथील तहसील कार्यालयाच्या आवारात स्मृतिस्तंभ उभारला होता. नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम सुरू झाल्याने तो स्तंभ तिथून हलविण्यात आला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १७ कोटींचा निधी मंजूर केल्याने त्यातून जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर केले जात आहे. त्यामुळे तेथील तहसील कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन तसेच सेतू केंद्राची पूर्वीची इमारत पाडण्यात आली आहे.
पाडलेल्या इमारतीनंतर निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता पी. आर. जाधव यांच्या हस्ते त्या ठिकाणी असलेल्या स्मृतिस्तंभाचे पूजन करून तो तिथून हटविण्यात आला. हटविण्यात आलेला स्मृतिस्तंभ सध्या मार्केटयार्ड येथील इमारतीसमोर बसविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
स्मृतिस्तंभाचे महत्त्व आजही
स्मृतिस्तंभाच्या आठवणी कायम स्मृतीत राहाव्यात म्हणून शासकीय कार्यालयांकडून विशेष प्रयत्न केले जातात. स्वातंत्र्य लढाई तसेच मोर्चे अशांमध्ये सहभाग घेतलेले स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवक कार्यकर्ते यांच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ शहरातील पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालय आवारात बसविण्यात आले आहेत. त्याचे आजही महत्त्व राखले जाते.
नव्या जागी जुना स्मृतिस्तंभ
मार्केट यार्ड या ठिकाणी जुन्या न्यायालय इमारतीत तहसील कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन तसेच उत्पादन शुल्क कार्यालय आवारात तात्पुरत्या स्वरूपात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या स्तंभावर जुना स्मृतिस्तंभ लवकरच बसविण्यात येणार आहे.