प्रकाशाच्या सणाला पणत्यांची चाहूल!
By Admin | Updated: October 18, 2014 23:24 IST2014-10-18T23:24:26+5:302014-10-18T23:24:26+5:30
बाजारपेठ सजली : खरेदीसाठी उडालीय झुंबड

प्रकाशाच्या सणाला पणत्यांची चाहूल!
सातारा : दिवाळीची चाहूल देणाऱ्या पणत्या बाजारपेठेत डेरे दाखल झाल्या आहेत. पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत असणाऱ्या या पणत्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यंदा तुळशीवृंदावन आकारातील पणत्यांना चांगली मागणी आहे.
गत वर्षीप्रमाणेच यंदाही बाजारपेठेत मातीच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता यंदा चिनी मातीच्या पणत्याही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आहेत. चकचकित आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या गुजराथी पणत्याही ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
कॉर्पोरेट जगात आधुनिक आणि पारंपरिक बाज सांभाळत तयार करण्यात आलेल्या पणत्या अधिक खपत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि पणतीला खुलविण्यासाठी जरदोसी वर्कही करण्यात येत आहे. याबरोबरच पणतीवर काच, मणी आणि मोती यांची आकर्षक डिझाईन करण्यात आली आहे. भडक लाल, विटकरी आणि सोनेरी रंगात असलेल्या या पणत्या ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत.
ऐन दिवाळीत पणत्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात, या गोष्टी लक्षात घेऊन बाजारात उपलब्ध असणाऱ्या पणत्या सध्या कमी किमतीत नेऊन ग्राहक ठेवत आहेत. साताऱ्यातील कुंभारवाड्यातही पणत्या तयार करून त्यांची विक्री जोरदारपणे सुरू आहे.
यावर्षी पाच रुपयाला एक आणि पन्नास रुपये डझन असे पणतीचे किमान दर आहेत. रंगीत पणती आठ रुपये आणि डिझायनर पणती पंधरा रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तुळशीवृंदावन आकारातील पणती पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत मिळते. तर गो रूपातील पणती दीडशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सध्या पणत्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
विविध आकारातील आणि रंगीत पणत्या पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. घर आणि अंगण उजळवून टाकण्यासाठी या पणत्या सज्ज झाल्या आहेत. (प्रतिनिधी)