सुज्ञ मतदारांनी राखला सत्तेचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:22+5:302021-08-15T04:40:22+5:30

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आजमितीस बहुमत असतानाही उपसरपंच मात्र देसाई गटाचा आहे. अडीच वर्षांपूर्वी ...

Wise voters maintain a balance of power | सुज्ञ मतदारांनी राखला सत्तेचा समतोल

सुज्ञ मतदारांनी राखला सत्तेचा समतोल

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आजमितीस बहुमत असतानाही उपसरपंच मात्र देसाई गटाचा आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अवघ्या दोन मतांनी झालेल्या पराभवाचा वचपा काढत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पाटणकर गटाने अखेर सरपंच पद मिळवत विरोधकांची दाणादाण उडवून दिली. मात्र, उपसरपंच हा आजही विरोधी देसाई गटाचाच असल्याने राष्ट्रवादीला उपसरपंच पद मिळवता येणार का, आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी सध्याचे उपसरपंच असणारे सुरेश काटे यांनाच पाच वर्षे उपसरपंच पद देणार की देसाई गट आपल्याकडेच उपसरपंच पद ठेवणार याकडे संपूर्ण चाफळ विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.

चाफळ विभागातील सर्वांत मोठी व बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेली ग्रामपंचायत म्हणून चाफळकडे पाहिले जाते. तालुक्याच्या राजकारणात आग्रही व संवेदनशील ठरणाऱ्या या चाफळ गावात गत अडीच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. यावेळी सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्यात आली होती. दरम्यान, देसाई-पाटणकर गटात अटीतटीचा सामना होऊन देसाई गटाचे सूर्यकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पाटणकर गटाचे लक्ष्मण सीताराम बाबर यांना अवघ्या दोन मतांनी पराभूत करत विजयी व लोकनियुक्त सरपंच ठरले होते. यावेळी सुज्ञ मतदारांनी पाटणकर गटाला पाच सदस्य व देसाई गटाकडे चार सदस्य व सरपंच पद बहाल करत सत्तेचा समतोल राखला होता. त्यानंतर सत्तेच्या सारिपाटात येथे राष्ट्रवादीच्या एका सदस्याचे सदस्यत्व गेल्याने आपोआपच उपसरपंच पद देखील देसाई गटाच्या पथ्यावर पडले गेले. दरम्यान, येथे रिक्त सदस्यासाठी पोटनिवडणूक झाली व पुन्हा पाटणकर गटाच्याच सदस्याला सुज्ञ मतदारांनी ग्रामपंचायतीवर निवडून देत सत्तेत समतोल राखला; परंतु संख्याबळ कमी असल्याने पाटणकर गटाला विरोधी बाकावर बसण्यापलीकडे कोणताच पर्याय उरला नाही. दुर्दैव असे की, अडीच वर्षे होताच लोकनियुक्त सरपंच सूर्यकांत पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. देसाई गटाकडे चार, तर पाटणकर गटाकडे पाच सदस्य व सरपंच पद रिक्त अशी परिस्थिती उभी राहिली गेली. नव्याने पुन्हा सरपंचपदासाठी पोटनिवडणूक लागली. ही पोटनिवडणूक जनतेतून न घेता निवडून आलेल्या सदस्यांतून सरपंच निवड करण्याचा नवा आदेश शासनाने पारित केल्याने तशा पद्धतीने येथे निवडणूक झाली. पाटणकर गटाकडे बहुमत असल्याने या सत्तेच्या सारिपाटात पाटणकर गटाला सरपंच पद मिळाले. सध्या पाटणकर गटाचे आशिष पवार हे सरपंचपदी विराजमान आहेत.

चौकट

एकंदरीतच राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी सत्तेचे विभाजन राखल्याचेच वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. आजही येथील ज्येष्ठ मतदारांनी पाटणकर गटाला सरपंच, तर देसाई गटाला उपसरपंच पद देत दोन्ही गटाच्या नेत्यांची कोंडी केली आहे. सध्या दोन्ही गटांकडे सरपंच व उपसरपंच ही मुख्य व प्रमुख पदे असल्याने गावचा विकास कोण करणार? का दोन्ही गटाची नेतेमंडळी मतदार राजाला वाऱ्यावर सोडणार, असा प्रश्न सतावत आहे.

Web Title: Wise voters maintain a balance of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.