वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वायरमनची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:18+5:302021-05-23T04:39:18+5:30
वरकुटे-मलवडी : तौउते चक्रीवादळाच्या तडाख्यातील वादळी वाऱ्यामुळे माण तालुक्यातील पळसावडे, काळचौंडी, शेनवडी या ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. ...

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वायरमनची कसरत
वरकुटे-मलवडी : तौउते चक्रीवादळाच्या तडाख्यातील वादळी वाऱ्यामुळे माण तालुक्यातील पळसावडे, काळचौंडी, शेनवडी या ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. परिणामी काळचौंडी, शेनवडी या ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडल्या तर पळसावडेत ठिकठिकाणी विजेच्या चार खांबांसह विद्युत वाहिन्यांंच्या ताराही तुटून पडल्या. यामुळे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत, चार दिवसांत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.
सध्या अवकाळी पावसाचे दिवस असल्याने दरवर्षीप्रमाणे अचानक आलेल्या तौउते चक्रीवादळाने महावितरणची यंत्रणा कोलमडली. मात्र, दिवस-रात्र जीवाचे रान करून वीज कर्मचाऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे. यावेळी आव्हानात्मक परिस्थिती हाताळताना अभियंते, वायरमन यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारांवर पडलेली झाडे स्वतः बाजूला करून ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
पळसावडे येथे चार विद्युत खांब पडल्यामुळे, महावितरणचे सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पूर्व भागात चक्रीवादळामुळे काळचौंडी, शेनवडीसह अनेक ठिकाणी तारांंवर झाडे उन्मळून पडल्याने तीन-चार दिवस दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. एका कर्मचाऱ्याकडे अनेक गावचा पदभार असल्याने वायरमनची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. तरीही देवापूर विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत टप्प्याटप्प्याने माणच्या पूर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत करीत नागरिकांना दिलासा दिला आहे.
फोटो : २२वरकुटे-मलवडी
पळसावडेत विद्युत खांबावर पडलेले झाड महावितरणचे कर्मचारी पिनू लोखंडे यांनी हटविले. (छाया : सिद्धार्थ सरतापे)