पाच हजार घेताना वायरमन जाळ्यात
By Admin | Updated: April 17, 2016 23:26 IST2016-04-17T21:10:58+5:302016-04-17T23:26:48+5:30
कऱ्हाडात कारवाई : कोल्हापूरमधील आॅफिसचे कनेक्शन जोडण्यासाठी लाच

पाच हजार घेताना वायरमन जाळ्यात
कऱ्हाड : कोल्हापूर येथील आॅफिसचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना बाह्यस्रोत वायरमनला कऱ्हाडात रंगेहाथ पकडण्यात आले. या वायरमनने एकूण १५ हजारांची मागणी केली होती आणि दहा हजार यापूर्वीच स्वीकारले आहेत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. सातारा लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
धनंजय रामदास कुलकर्णी (वय ३३, रा. रत्नदेव सोसायटी, नागाळा पार्क, कोल्हापूर, मूळ रा. चिकोडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे या बाह्यस्रोत वायरमनचे नाव असून, राज्य वीजवितरण कंपनीच्या नागाळा पार्क कार्यालयात तो कार्यरत आहे. तक्रारदाराच्या कोल्हापूर येथील कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. ते पूर्ववत जोडण्यासाठी धनंजय कुलकर्णीने १५ हजारांची मागणी केली असून, त्यातील १० हजार आपण त्याला पूर्वीच दिले आहेत, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले होते. उर्वरित पाच हजारांची वारंवार मागणी करण्यात येत असून, ही रक्कम कऱ्हाड येथे आणून देण्यास आपणास सांगण्यात आले आहे, असे तक्रारदाराने म्हटले होते.
त्यानुसार पडताळणी करून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कऱ्हाड येथे सापळा रचला आणि कुलकर्णी यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध कऱ्हाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)