सर्दी, खोकला अन् तापानं सातारकर हैराण !

By Admin | Updated: August 1, 2016 00:39 IST2016-08-01T00:39:36+5:302016-08-01T00:39:36+5:30

विषाणूंपासून प्रसार : जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल

Winter, cough and heat Satarkar Hiran! | सर्दी, खोकला अन् तापानं सातारकर हैराण !

सर्दी, खोकला अन् तापानं सातारकर हैराण !

सातारा : सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा आजाराने सातारकर हैराण झाले आहेत. उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तर अनेकजण औषधाच्या दुकानातून गोळ्या घेऊन तात्पुरते उपचार करत आहेत.
जिल्ह्यातील वातावरण गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित असल्याचे जाणवत आहे. पंधरा दिवसांपासून म्हणावा असा कोठेही पाऊस पडलेला नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असते. कडक ऊन पडलेले नसल्याने कोंदट वातावरण बनत आहे.
घर, कार्यालयातही त्याच प्रकारचे वातावरण असल्याने आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कडक ऊन नसल्याने हवेतील विषाणू मरत नाहीत. तेच एकापासून दुसऱ्याला अन् दुसऱ्यापासून तिसऱ्या असा आजारांचा फैलाव होत आहे.
सुरुवातील डोके दुखणे, घसा खवखवणे, सर्दी होणे यासारखी लक्षणे जाणवतात. त्यानंतर प्रचंड खोकल्याचा त्रास सुरू होतो. सर्दीमुळे कफ तयार झाल्याने वारंवार उबाळी येते. एकदा खोकला सुरू झाला तर तो थांबण्याचे नावच घेत नाही.
अनेकांना रात्री कडक ताप येत आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणेही अवघड होऊन जात आहे. आपल्यापासून इतरांना फैलाव होऊ नये म्हणून अनेकजण घरात बसणेच पसंत करत आहेत.
विशेष म्हणजे, आजारी पडणाऱ्यांमध्ये तरुण व प्रौढ व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे जाणवत आहे. लहान मुलं आजारी पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. (प्रतिनिधी)
ढगांमुळे गुडघेदुखी
ढगाळ वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधे, गुडघे दुखी यासारखे आजार डोके वर काढत आहेत. यावर फारसा इलाजही नसल्याने वेदनाशामक मलम लावूनच तात्पुरते उपचार करावे लागतात.
गोळ्या पचनी
अनेकांना सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंग दुखीला दवाखान्यात न जाता औषधांच्या दुकानातून गोळ्या घेण्याची सवय असते. त्यांना आता वेगळाच अनुभव येत आहे. मेडिकल दुकानदार शक्यतो कमी क्षमतेच्या गोळ्या देतात. या गोळ्या काम करत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे दवाखान्याची पायरी चढावीच लागत आहे.
या दिवसांमध्ये आजारी पडूच नये यासाठी आहारात पालेभाज्या व ‘क’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी आंबट पदार्थांचा वापर करावा. तसेच बाहेर फिरताना नाका, तोंडावर रुमाल धरावे.
- डॉ. धैर्यशील कुलकर्णी, सातारा.
 

Web Title: Winter, cough and heat Satarkar Hiran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.