वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: May 10, 2015 00:43 IST2015-05-10T00:38:25+5:302015-05-10T00:43:27+5:30
खटाव तालुक्यात गारा : झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडित

वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत
सातारा : सातारा शहरासह कऱ्हाड, पाटण, खटाव, माण तालुक्यांना वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी रस्त्यावर शेकडो झाडे उन्मळून पडली असून, शहरातील फलक पडले आहेत. काहीकाळ विद्युतपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
सातारा शहरात शनिवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. रात्री सातच्या सुमारास प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. वादळी वाऱ्याबरोबरच वातावरणात धुळीचे कण उडत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे समोरचे काही न दिसल्याने राजपथ, खालच्या रस्त्यावर मोटारसायकली एकमेकांवर आदळल्या. जाहिरातींचे फलक रस्त्यावर पडले होते. त्यामुळे सुमारे अर्धा तास वीजपुरवठा खंडित केला होता.
कऱ्हाड शहरातही अचानक काळे ढग जमा झाले अन् वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळेतच रस्ते सामसूम झाले. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील शेकडो झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जावळी, वाई, खटाव, फलटण तालुक्यांतही पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सर्व भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. खटाव तालुक्यातील चोराडे परिसरात बोरांच्या आकाराच्या गारा पडल्या. (प्रतिनिधी)