वादळी पाऊस उडवून गेला दाणादाण...
By Admin | Updated: May 11, 2015 00:45 IST2015-05-11T00:45:15+5:302015-05-11T00:45:31+5:30
वळवाचा तडाखा : पावसाने लाखोंचे नुकसान; शेतकऱ्यांवर संक्रांत; झाडे पडली, पत्रे उडाले अन् पिके भुईसपाट

वादळी पाऊस उडवून गेला दाणादाण...
सातारा : सातारा जिल्ह्याला गेल्या आठ दिवसांमध्ये वळवाच्या पावसाने दोनदा झोडपून काढले. शनिवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारांसह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक ठिकाणी उन्हाळी पिके भुईसपाट झाली. शेकडो झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवडा खंडित झाला होता. झाडे पडल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला देखील वळवाने झोडपून काढले. याठिकाणी स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाई : वाई शहर व परिसरात शनिवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला तर ग्रामीण भागात काही ठिकाणी सोसाट्याच्या वादळामुळे घराचे पत्रे व झाडाच्या फांद्या मोडून पडल्या काही ठिकाणी गुरांचा चारा, गवत भिजले व धोम धरणाच्या काठावरील काही गावांत तोडणीसाठी आलेली फराशी, घेवडा पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
यावर्षी पावसाने वेळोवेळी हजेरी लावल्याने शेतीचे पिकांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी ज्वारी, गहू काढणीच्या वेळी शेतात भिजला. त्यामुळे ज्वारी, गहू व कडबा भिजला. शनिवारी रात्रीही पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली. ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या मोडल्या व वीजपुरवठा बंद झाला. काही ठिकाणी गुरांचा चारा, गवत, सरपणासाठी वापरल्या जाणाऱ्या गोवऱ्याही भिजून गेल्या. सध्या लग्नांची मोठी सराई चालू असून, पावसामुळे वऱ्हाडी मंडळीचीही धावपळ बघायला मिळाली.
आदर्कीत आंबा, डाळिंबाचे नुकसान
आदर्की : आदर्कीसह परिसरात शनिवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा, डाळिंब, टोमॅटो, मका, कडवळ या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. फलटण तालुक्याच्या पश्चिमेला भागात असलेल्या आदर्की, वाघोशी, कोऱ्हाळे, बिबी या गावांना शनिवारी वादळी वारे व अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बसरल्या.
वळवाने माळव्याचे पिकांचे नुकसान
कऱ्हाड : तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने लाखोंचे नुकसान झाले. शेतीपिकांसह शहरात अनेक ठिकाणी जाहिरात फलक मोडून पडले आहेत. तर वीज खांबही जमीनदोस्त झाले आहेत.
कऱ्हाड शहरासह तालुक्याला शनिवारी रात्री वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. गत चार दिवसांपासून पाऊस हुलकाणी देत होता. अखेर शनिवारी रात्री अचानक जोरदार पावसाने कऱ्हाड तालुक्याला झोडपून काढले. सायंकाळी वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यामध्ये शहरात ठिकठिकाणी जाहिरात फलक मोडून पडले.
महामार्गासह अन्य मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पाचवड फाटा येथे महामार्गावर कोसळलेले झाड जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आल्यानंतर कोल्हापूर सातारा लेनवरील वाहतूक पूर्ववत झाली. तसेच उंडाळे मार्गावर पडलेली झाडे हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तोपर्यंत पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली.
पावसाने तालुक्यात माळव्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. टोमॅटो पिकाला पाऊस व वादळाचा मोठा फटका बसला.
मसूर : मसूर, कवठे, किवळ, हेळगाव परिसरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. तसेच मका, ऊस या पिकांबरोबरच आंब्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळी वाऱ्यामुळे नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथील लक्ष्मण मारुती साळुंखे यांचे नवीनच बांधलेल्या घराचा पत्रा अँगलसह उडून गेला. हा पत्रा दत्तात्रय नाना यादव यांच्या घरावर पडल्याने या दोन्ही घरांचे मिळून सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. या घरांचा गावकामगार तलाठी आर. डी. खुडे यांनी पंचनामा केला आहे.
3मसूर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला होता. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर ऊस पीक भुईसपाट झाले आहे. उन्हाळ्यामध्ये शेतात जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेले मका पीक पूर्णत: जमीनदोस्त झाले असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसामुळे आंब्याच्या झाडाखाली आंब्यांचा खच पडला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. कचरेवाडी, ता. कराड येथे रस्त्यावरच झाड पडल्याने वाहतूक ठप्प होती. पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसतोडणीची कामेही खोळंबली
होती.