वने वाऱ्यावर; समित्या कागदावर
By Admin | Updated: November 22, 2014 00:19 IST2014-11-21T21:13:45+5:302014-11-22T00:19:40+5:30
सदस्य अधिकारांपासून अंधारात : लाकूडतोड, शिकार मात्र सुरूच

वने वाऱ्यावर; समित्या कागदावर
सणबूर : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली; मात्र त्या समित्या सध्या कागदावरच राहिल्या असल्याचे चित्र आहे़ अनेकांना ते त्या समितीत आहेत, याचीही माहिती नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे राजरोसपणे जंगलपट्ट्यात लाकूडतोड व शिकार सुरू असतानाही, त्याची माहिती वन विभागाला तातडीने मिळू शकत नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना त्यांच्या अधिकारांचीही जाणीवच करून देण्यात आलेली नाही़ त्यामुळे या समित्या असून नसल्यासारख्या
आहेत़
ढेबेवाडी विभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे़ त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आहे़ मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची अपुरी असलेली संख्या आणि मोठ्या प्रमाणात असणारे कार्यक्षेत्राचा मेळ घालणे अवघड बनले आहे़ सध्या उपलब्ध असलेल्या वनाचे रक्षण, लोकसहभाग वाढावा आणि लोकांच्यामध्ये त्याबाबतची जनजागृती व्हावी, यासाठी गावोगावी वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली़ त्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी वनक्षेत्र व त्याचा परिसर आहे, त्या ठिकाणच्या प्रत्येक गावात वनसमितीची स्थापना करण्यात आली आहेत़ या समित्यांना अनेक हक्क व अधिकार देण्यात आले आहेत़ असे असतानाही मात्र त्या समित्यांच्या कामामध्ये सातत्य दिसत नाही़
स्थापन करण्यात आलेल्या वनसमित्या केवळ कागदावरच राहिल्याने वनाच्या व वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ शिवाय परिसरात लाकूडतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ त्याबाबतची माहिती वनविभागाला मिळत नाही़
त्यामुळे त्यांना कारवाई करताना समस्या निर्माण होत आहेत़ परिणामी लाकूडतोड करणाऱ्यांवर कारवाई होणार कशी? हाच प्रश्न निर्माण झाला आहे़ (वार्ताहर)
सदस्यच अनभिज्ञ
वनसंरक्षण समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक हे सदस्य असतात़ तर वनपाल हे त्या समितीचे सचिव असतात़ त्याचबरोबर स्वायत्त संस्थेने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि अन्य सहा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असतो; पण अनेक ठिकाणी या अन्य सहा सदस्यांनाच आपण समितीत असल्याचे माहीत दिसत नाही़