सातारचा ‘भोपाळ’ करणार का ?
By Admin | Updated: November 26, 2014 00:06 IST2014-11-25T22:00:35+5:302014-11-26T00:06:28+5:30
‘भीमेश्वरी’ चे प्रदूषण : देगाव, निगडी ग्रामस्थांचा सवाल; ‘पीसीबी’च्या आदेशाला केराची टोपली

सातारचा ‘भोपाळ’ करणार का ?
सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्पात कंपनीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या धूर व कार्बनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होऊ लागले आहेत. अनेकदा या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देवूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रशासन भोपाळच्या पुनरावृत्तीची वाट पाहातय का, असा सवाल कारंडवाडी, देगांव, निगडी परिसरातील नागरिक करीत आहेत.
देगाव रस्त्यावरील लोकवस्तीलगत भीमेश्वर इस्पात हा लोखंड प्रक्रिया करून स्टीलनिर्मिती करणारा कारखाना आहे. कारंडवाडी, देगाव आणि निगडी परिसर या कारखान्याला लागून आहे. या कंपनीमध्ये रात्रंदिवस उत्पादन सुरू केले आहे. कारखान्यातील काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर फेकला जातो. ज्या ठिकाणाहून धूर सोडण्यात येतो, ती नळी (चिमणी) ची उंची कमी आहे. त्यातच तो भाग सखल असल्यामुळे त्यातून बाहेर पडणारा धूर वाऱ्यामुळे कारंडवाडी परिसरात पसरतो. धुरामुळे रहिवाशांच्या डोळ्यांची जळजळ होत आहे. घरांची पत्रे, छतावर काजळीचा थर साठला आहे. घरांच्या खिडक्या, काचा, भांडी, काळी पडू लागली आहेत.
देगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही.
धुरामुळेच नागरिकांच्या आरोग्यला धोका होत आहे. हे वैद्यकीय तपासणी केल्याशीवाय समजणार नाही, त्यामुळे प्रशासनाने आजारी पडणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, अशीही नागरिकांतून मागणी होत आहे. माणसांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्यावे, अशा आशयाचे नोटीस पाठविले आहे. मात्र अद्याप कंपनीच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून आणखीनच संतापाची लाट उसळली आहे. प्रदूषण मंडळालाही न जुमानणाऱ्या या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांतून उठाव झाल्यानंतर तरी जाग येईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
येत्या काही दिवसांत जर त्या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी वेळोवेळी कंपनीला दिला
आहे. (प्रतिनिधी)
झोपेत जीव गुदमरण्याची भीती
देगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. रात्री अचानक झोपेत असताना धूरामुळे जीव गुदमरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे.
जास्त धुराचाही आरोग्यास धोका असतो. त्यामुळे इस्पात कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्या म्हणून नोटीस दिली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.
- आय. टी. गायकवाड, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी