भरणार नाही बिल.. तर गाळे होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST2021-03-25T04:38:16+5:302021-03-25T04:38:16+5:30
सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ सहा दिवस उरले असताना पालिकेच्या थकबाकीदारांनी कर भरण्याकडे अजूनही पाठ फिरविली आहे. ...

भरणार नाही बिल.. तर गाळे होणार सील
सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ सहा दिवस उरले असताना पालिकेच्या थकबाकीदारांनी कर भरण्याकडे अजूनही पाठ फिरविली आहे. जप्तीची नोटीस बजावूनही अनेक गाळेधारकांनी थकीत कराचा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. त्यामुळे थकबाकीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेच्या वसुली पथकाला आता नोटिसा बजावण्याऐवजी थेट गाळे सील करण्याची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
पालिकेच्या हद्दीत तब्बल ३६ हजार मिळकती आहेत. हद्दवाढीमुळे मिळकतींमध्ये आणखी २५ हजारांची भर पडली आहे; मात्र अद्याप वाढीव भागातील मिळकतींना पालिकेची करप्रणाली लागू झालेली नाही. सद्यस्थितीत पालिकेकडून निवासी मिळकतींची तीन तर व्यावसायिक मिळकतींची सहा रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे कर आकारणी केली जाते. यंदा पालिकेला करापोटी एकूण ४४ कोटी ८६ लाख ६४ हजार ७३३ रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी सुुमारे १३ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मात्र, शहरातील गाळेधारकांच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप जैसे थे आहे.
पालिकेच्या मालकीचे शहरात तब्बल ३१८ गाळे आहेत. यापैकी अनेक गाळेधारकांनी एक ते दोन वर्षांपासून करच भरलेला नाही. जप्तीची नोटीस हातात पडताच काही गाळेधारकांनी स्वत: पालिकेत येऊन कराचा भरणा केला. मात्र अनेक गाळेधारकांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. केवळ जप्तीची नोटीस बजावून पालिकेला थकबाकीचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. यासाठी वसुली विभागाला आता ठोस पावले उचलावी लागणार आहे. शहरातील बड्या थकबाकीदारांचे गाळे सील केल्यास आपसूकच अनेकजण वसुलीसाठी पुढे येऊ शकतात. पालिकेकडून कोणत्याही क्षणी गाळे सील करण्याची मोहीम हाती घेतली जाऊ शकते. त्यामुळे कारवाईपासून बचाव करण्यासाठी थकबाकीदारांसमोर कर जमा करणे एवढाच पर्याय उरलेला आहे.
लोगो : सातारा पालिका फोटो