ग्रामपंचायतीचा कारभारी बदलणार का?

By Admin | Updated: April 1, 2015 00:11 IST2015-03-31T22:19:10+5:302015-04-01T00:11:05+5:30

तरडगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा : वर्षानंतरही पदाधिकारी निवडीच्या हालचाली नाहीत

Will the gram panchayat's steward change? | ग्रामपंचायतीचा कारभारी बदलणार का?

ग्रामपंचायतीचा कारभारी बदलणार का?

सचिन गायकवाड - तरडगाव , ता. फलटण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वर्षाच्या कारभारानंतर ‘लोकमत’ने काही सदस्यांशी संवाद साधला असता वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक सदस्याला पाच वर्षांच्या काळात सरपंच, उपसरपंच पदाची संधी विभागून दिली जाईल, असे आश्वासन दिले गेल्याची माहिती समोर आली. सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या दहा आहे. मात्र, वर्ष झाले तरी अजून नवीन पदाधिकारी निवडीसाठी हालचाली होताना दिसत नाहीत. यामुळे कारभारी बदलून इतरांना संधी दिली जाणार की नाही? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.डिसेंबर २०१३ मध्ये राजे गटाच्या आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने १५ पैकी १० जागा जिंकून विरोधी तरडगाव विकास आघाडीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्च २०१४ मध्ये सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडी झाल्या. वर्षाच्या कारभारानंतर काही सदस्यांशी संवाद साधला तेव्हा, त्यांच्याकडून वेगळीच माहिती समोर आली. त्यांच्या सांगण्यावरून गेल्यावर्षी फलटण येथील बैठकीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना पुढील पाच वर्षांत गावचा करभार पाहण्याची म्हणजेच सरपंच, उपसरपंच पदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.
सध्या ग्रामपंचायतीत सत्ताधारी सदस्य संख्या दहा आहे. यावरून प्रत्येकाला संधी द्यावयाची झाल्यास प्रत्येक वर्षी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागणार हे सरळ गणित आहे. परंतु, वर्ष झाले तरी पदाधिकारी निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या नसल्याचे नाराज सदस्यांच्या बोलण्यावरून दिसून येते.सन २००८-०९ मध्ये चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून विरोधी तरडगाव विकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला होता. वसंतराव गायकवाड यांची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली होती. त्यानंतर विकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये, सर्व सामान्यांना सत्तेत समान संधी मिळावी, पदे कोणा एकाच्या घरात वाटली जावू नयेत, कोणाचीही मालकी असू नये या उद्देशाने पाच वर्षांत सर्व सदस्यांना सरपंच, उपसरपंच ही पदे विभागून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पुढे तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आला.
विकास आघाडीने पाच वर्षांत सर्व सदस्यांना जशी कारभाराची संधी दिली. तसे चित्र सध्या सत्ताधारी असलेल्या भैरवनाथ पॅनेलकडून आपल्या सर्व सदस्यांना पदांची संधी देऊन पुढील काळात दिसणार का? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
एकीकडे सत्ताधारी सदस्यांमध्ये आपल्याला देखील पद मिळावे, अशी कुजबूज सुरू आहे. बोलायचे आहे; पण बोलू कसे अशी दुविधा असल्यामुळे सगळ्यांनीच हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका स्विकारली आहे. मनातील भावना कोणत्या पध्दतीने व्यक्त कराव्यात हे समजत नसल्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली आहे.


सर्व समावेशक भूमिका गरजेची
पदाच्या व गटाच्या पुढील राजकीय उज्ज्वल भवितव्यासाठी दिलेल्या आश्वासनावरून पाच वर्षांत सर्वांना पदांची संधी देता यावी, यासाठी स्थानिक व तालुका पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत ठोस सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Will the gram panchayat's steward change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.