भरतगाव बंधाऱ्यामुळे कायापालट होणार : शिवेंद्रराजे
By Admin | Updated: November 28, 2014 00:12 IST2014-11-27T22:17:28+5:302014-11-28T00:12:15+5:30
हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे

भरतगाव बंधाऱ्यामुळे कायापालट होणार : शिवेंद्रराजे
सातारा : ‘भरतगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून, या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. या बंधाऱ्याच्या परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. या बंधाऱ्यामुळे भरतगाव आणि परिसरातील गावांचा कायापालट होणार आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा सदुपयोग करून भरतगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न वाढवून आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून भरतगाव येथील के. टी. वेअर बंधाऱ्यासाठी एक कोटी १७ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या बंधाऱ्याचे काम जून महिन्यात पूर्ण झाले असून, या बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या बंधाऱ्यातील जलपूजन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वनिता पोतेकर, सातारा पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ, माजी उपसभापती अॅड. अरविंंद चव्हाण, भरतगावचे सरपंच अशोक पाटील, विकास सेवा सोसायटीवे चेअरमन संजीवन कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले म्हणाले, दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्यात विकासाची गंगा सुरू केली. अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला हक्काची बाजारपेठ मिळाली. उसाचे उत्पादन वाढावे, यासाठी पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. भरतगाव, भरतगाववाडी, वळसे, पाडळी आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भरतगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या उभारणीनंतर लगेचच बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला. या बंधाऱ्यामुळे आसपासच्या गावचा शेतीचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या बंधाऱ्यामुळे या परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाचे पीक घ्यावे. टनेजमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाण्याचा शेतीच्या उत्पादन वाढीसाठी वापर करावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी.’
सरपंच अशोक पाटील, सोसायटीे सचिव विकास कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास भरतगाव, वळसे, भरतगाव वाडी, पाडळी आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)