जखिणवाडी होणार ‘स्त्रीसत्ताक’
By Admin | Updated: October 6, 2015 23:38 IST2015-10-06T21:38:36+5:302015-10-06T23:38:51+5:30
ग्रामसभेत ठराव : अकरा महिला सदस्य होणार बिनविरोध

जखिणवाडी होणार ‘स्त्रीसत्ताक’
मलकापूर : जखिणवाडी, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावर आली असताना सदस्यांसह ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष ग्रामसभा घेऊन गावाच्या दृष्टीने ऐतिहासीक निर्णय घेतला. सर्वच्या सर्व अकरा जागांवर महिला उमेदवार बिनविरोध निवडणूक देण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा दिला. त्यामुळे महिनाभरात ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’ दिसून येणार आहे.
जखिणवाडी येथे मंगळवारी विशेष ग्रामसभा बोलविली होती. अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड होते. माजी सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील, रामचंद्र विष्णू पाटील, पंचायत समिती सदस्या पुष्पावती पाटील, नानासाहेब पवार, आप्पासाहेब पाटील, इंदूमती पवार, माजी उपसरपंच महेश गुरव यांच्यासह सर्व सदस्य व शेकडो महिला उपस्थित होत्या.
ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून नांगरे-पाटील गटाची सत्ता आहे. मात्र, यावर्षी बिनविरोध करण्यासाठी नरेंद्र नांगरे-पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हालचाली सुरू होत्या. तलाठी चंद्रकांत पारवे व ग्रामविकास अधिकारी एन. डी. लोहार यांनी गावच्या विकासाबद्दल माहिती दिली.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबरोबरच सर्वच्या सर्व अकरा जागांवर महिला सदस्या निवडून द्याव्यात, असा ठराव मांडला. एकाही ग्रामस्थाने ठरावाविरोधात आपले मत व्यक्त केले
नाही. जेष्ठ नागरिक पी. जी. पाटील व संपतराव पाटील यांनी
या ठरावाला अनुमोदन
दिले. (प्रतिनिधी)
पन्नास नव्हे शंभर टक्के महिला
जखिणवाडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य संख्या आहे. शासनाच्या नियमानुसार पन्नास टक्के आरक्षणात सहा महिला सदस्यांना संधी मिळणार होती. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यभर नाव झाल्याने नवा पायंडा पाडण्यासाठी शंभरटक्के महिलांनाच गाव कारभार करण्याची संधी देण्याचा निर्णय यावेळी झाला.
सत्ताधाऱ्यांचा ठराव विरोधकांचे अनुमोदन
जखिणवाडीत अकराच्या अकरा जागांवर महिलांना संधी देणे व बिनविरोध निवडणूक करण्याचा ठराव सत्ताधारी गटाच्या रामदादा पाटील यांनी मांडला. तर आजपर्यंत विरोधकांची सक्षम बाजू मांडणाऱ्या पी. जी. पाटील व संपतराव पाटील यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. त्यामुळे गावाची ऐकी यापुढेही अबाधीत राहिल याची प्रचिती दिली.
उत्तम प्रकारच्या कामामुळेच जखिणवाडीला १३ पुरस्कार मिळाले आहेत. केवळ निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र, गावाने सर्वजागांवर महिलांना संधी देण्याचा ग्रामसभेत ठराव केल्याने दुधात साखरच पडली आहे.
- बी. एम. गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, कऱ्हाड