इच्छुकांची इच्छाशक्ती येणार बैठकीत फळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:37+5:302021-02-05T09:09:37+5:30
सातारा : जिल्हा परिषद सभापतिपदाची इच्छा असणाऱ्या सदस्यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या कानी वारंवार विषय नेल्याने काही दिवसांतच पक्षसदस्यांची बैठक ...

इच्छुकांची इच्छाशक्ती येणार बैठकीत फळाला !
सातारा : जिल्हा परिषद सभापतिपदाची इच्छा असणाऱ्या
सदस्यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या कानी वारंवार विषय नेल्याने काही दिवसांतच पक्षसदस्यांची बैठक साताऱ्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याचवेळी इच्छुकांची इच्छाशक्ती फळाला येणार का हे दिसून येणार आहे. पण, सध्यातरी इच्छुकांसाठी आशेचा किरण आहे.
जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक सदस्यांनी सभापतिपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले आहेत. कारण, पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर मागील वर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. सभापतींची निवड होण्यापूर्वी साताऱ्यातील झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अनपेक्षितपणे काही नावे समोर आले तेव्हा राज्य विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभापतींची नावे जाहीर करत एक वर्षासाठी पदे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार आताही सभापतिपदासाठी इच्छुक आहेत.
यामध्ये बापूराव जाधव, धैर्यशील अनपट, डॉ. अभय तावरे यांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. तसेच महिला व बालकल्याणसाठीही डॉ. भारती पोळ, दीपाली साळुंखे, अर्चना रांजणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक लवकरच साताऱ्यात होणार आहे. ही बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यावर होण्याची शक्यता आहे. ही बैठकच पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीतच सभापती बदलाचा खल रंगणार आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने सभापति बदलाचा काय तो निर्णय होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आणखी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
चौकट :
जिल्हा बँकेत खलबते...
जिल्हा बँकेत शुक्रवारी काही इच्छुकांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह इतर काही पक्षनेत्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सभापतिपदाचा विषय काढला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी ३ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे समोर येत आहे. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले.
.......................................................