भटक्या श्वानांचे पालकत्व कोणी स्वीकारेल का !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST2021-08-27T04:42:46+5:302021-08-27T04:42:46+5:30
सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जर दोन-चार ...

भटक्या श्वानांचे पालकत्व कोणी स्वीकारेल का !
सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जर दोन-चार वर्षांपूर्वी पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम सक्षमपणे राबविली असती तर श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आले असते, असे मत प्राणितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. शहरात एकीकडे श्वानांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे चार भटक्या श्वानांचा नुकताच आकस्मिक मृत्यू झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. वाढती संख्या व उपद्रवामुळेच या श्वानांवर कोणीतरी विषप्रयोग केला असावा, असे सांगितले जात आहे. असे असले तरी पालिकेने भटक्या श्वानांचा विषय आजवर कधीच गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे प्राणितज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र, हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. यानंतर चार वर्षांपूर्वी श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढू लागली आहे.
(चौकट)
चार वर्षांनंतर निर्बीजीकरण मोहीम !
सातारा शहरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, नागरिकांमधून भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याची दखल घेत पालिकेने चार वर्षांनंतर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, एका खासगी संस्थेमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे.
(चौकट)
श्वानांनी जिल्ह्यात इतक्या
जणांना घेतला चावा
२०१७ १६,१३१
२०१८ २१,०६८
२०१९ २६,३९२
२०२० २६,२५७
२०२१ ११६०
(चौकट)
यामुळे पिसाळताहेत श्वान
- संचारबंदीत हॉटेल, हातगाडे, दुकाने बंद होती.
- त्यामुळे श्वानांना सहज मिळणारे अन्न बंद झाले.
- लोकांनी त्यांना खाऊ-पिऊ घालणेही बंद केले.
- मिळेल त्या अन्नासाठी श्वानांमध्ये कळवंडं सुरू झाली.
- त्यामुळे श्वान आक्रमक झाले व पिसाळण्याचे प्रमाण वाढले.
- वाहनधारक व पादचाऱ्यांच्या अंगावर ते धावून जाऊ लागले.
(कोट)
वर्षभरात श्वानाची एक मादी दहा पिलांना जन्म देते. यातील सात-आठ पिल्ली आजाराने व अपघातात मृत्युमुखी पडतात. श्वानांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने उशिरा का होईना निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे राबवायला हवी.
- सायली त्रिंबके, साया ॲनिमल केअर सातारा