विधवेची जमीन दलालांकडून गिळंकृत!

By Admin | Updated: December 10, 2014 23:56 IST2014-12-10T21:54:25+5:302014-12-10T23:56:32+5:30

ढेबेवाडी विभागातील घटना : सातबारावरून नाव गायब करून बोगस व्यवहार

The widow's land was swallowed by the broker! | विधवेची जमीन दलालांकडून गिळंकृत!

विधवेची जमीन दलालांकडून गिळंकृत!

ढेबेवाडी : पवनचक्कीच्या वाऱ्यावर मिळालेल्या ‘वारे’माप पैशातून गबर झालेल्या दलालांनी आता महसूल विभागालाच आव्हान दिल्याच्या घटना पाटण तालुक्यात उघडकीस आल्या आहेत. ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर चक्क एका विधवा महिलेला गंडा घालून तिच्या परस्पर सुमारे पाच एकरचा भूखंड हडप केल्याची घटना उघडकीस आल्याने विभागात शेतकरी धास्तावले आहेत.
वाल्मीक पठारावरील तामीणे, पळणी, पाणेरी, आंबवडे, उधवणे आदी गावातील हजारो हेक्टर जमिनीची विक्री अलीकडे पाच-सहा वर्षांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगरपठारावरील भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना गंडा घालून कवडीमोल दराने जमिनी गिळंकृत करुन आतापर्यंत पवनचक्की दलालांनी वारेमाप कमाई केली आहे.
ज्या गावातील जमीन खरेदी करायची आहे, तेथीलच एखादा गावपुढारी अथवा गुंड हाताशी धरुन जमीन बळकावल्याच्या घटना राजरोस घडू लागल्याने आता शेतकरीही शहाणा झाला आहे. शेतकऱ्यांकडून एकरात खरेदी करुन कंपन्यांना गुंठेवारीवर विक्री करणारी दलालांची भानगड समोर आल्याने दलाल सैरभैर झाले आहेत. वाल्मीक पठारावर १५ नोव्हेंबर २०१४ रोजी अशाच एक
पाच एकर सहा गुंठे भूखंडाचा दस्त झाला.
तामीणे येथील २७ चा २१ या गटातील १०६ गुंठे जमिनीचा झालेला हा व्यवहार म्हणजे दलालांनी थेट महसूल विभागाला दिलेले
आव्हानच म्हणावे लागेल. या गटातील ७/१२ ज्या विधवा महिलेच्या नावावर आहे, त्या महिलेचे नावच चक्क ७/१२ वरुन गायब करण्याचे धाडस दलालांनी करुन बोगस व्यवहारांचा कळसच गाठला आहे.
यापूर्वीही पळशी येथील दलालांच्या टोळक्याने मृत खातेदारांच्या नावे व्यवहार केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल असतानाच आता या विभागात नवीन दलालांचे रॅकेट निर्माण झाल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दलालांकडून भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची एक प्रकारे लूटच केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने
याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. (वार्ताहर)


डोंगरपठारावर आतापर्यंत झालेल्या व्यवहारांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. दोषी दलालांवर कारवाई करावी.
- दिलीप पाटील, नेते श्रमिक दल
तामीणे येथील दस्ताची नोंद मंजुरीसाठी मंडल कार्यालयाकडे अजून झालेली नाही. त्यानंतर त्याची चौकशी करुन दोष असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले जाईल.
- राजपूत, मंडल अधिकारी


त्या महिलेवर दबाव
ज्या महिलेचे नाव ७/१२ वरुन अचानक गायब झाले आणि त्याच गटातील १०६ गुंठ्यांचा व्यवहार झाला. तरीसुद्धा संबंधित महिला अजून गप्प का? तिच्यावर दलालांनी दबाव टाकला आहे का? याचीही चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


या व्यवहारात दुय्यम निबंधकांची फसवणूक झाली असेल तर त्यांच्यामार्फत संबंधितावर गुन्हे दाखल होतील. अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकऱ्यांसाठी दर सहा महिन्यांनी ७/१२ काढून तपासून घ्यावा.
-रवींद्र सबनीस, तहसीलदार, पाटण

Web Title: The widow's land was swallowed by the broker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.