पीके क्यूं बोला ?

By Admin | Updated: January 10, 2015 00:16 IST2015-01-09T20:49:42+5:302015-01-10T00:16:20+5:30

फेरफटका

Why did PK speak? | पीके क्यूं बोला ?

पीके क्यूं बोला ?

टी.वाय.बी.ए. मध्ये शिकत असताना आम्हाला व्याकरण सोडविण्या-साठी एक वाक्य होते : ळङ्म २स्रीं‘ ३ँी ३१४३ँ ा१ंल्ल‘’८ ्र२ ं १्र२‘ ु४३ ८ङ्म४ ३१ं५ी ३ङ्म. अर्थात निखळ सत्य बोलण्यात धोका आहे, परंतु तुम्हाला सत्य बोलावे लागेल. पुढे ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीसचे अल्पचरित्र वाचताना या वाक्याची महती पटली होती. विद्रोही कवी तुकाराम, जोतिबा फुले, सावित्रीबाई आणि अलीकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनीही हा धोका पत्करला. दाभोळकरांनी कोणताही अभिनिवेश न आणता आणि कोणत्याही धर्मश्रद्धेला विरोध न करता अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले होते. तरीही तथाकथित पुण्यनगरीत त्यांचा खून झाला. सॉक्रेटीसवर खटला भरून त्याला मृत्यूदंड देण्यात आला होता. दाभोळकरांवर कोणताही खटला न भरता नि:शस्त्र असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. माणसांनी माणसाला ठार करावे, एवढा द्वेष माणसांमध्ये कसा काय निर्माण होऊ शकतो ? आपण खऱ्या अर्थाने माणूस असू तर विवेकी असलो पाहिजे, अन्यथा माणूस म्हणवून घेण्याचा तरी आम्हास काय अधिकार ? माणसाला अधिकाधिक विवेकी बनवून सत्याशी इमान राखण्याची सवय लावणे हे खऱ्या अर्थाने मानवतेचे कार्य आहे. हे सर्व इथे आठवण्याचे कारण ‘पीके’ या सिनेमाने केलेली विवेकवादाची पाठराखण. एक तद्दन व्यावसायिक सिनेमा म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा हा चित्रपट नाही. म्हणूनच त्याची गंभीरपणे नोंद घेणे आम्हास महत्त्वाचे वाटते. सिनेमा हा अखेर व्यवसाय आहे. तो लोकांनी पाहिला पाहिजे, हे भान कोणत्याही निर्मात्यास असलेच पाहिजे. पण, चार-दोन सेक्स आणि व्हॉयलन्सची दृश्ये, एक-दोन स्टंट, भव्य स्टेटस्, रोमँटिक गाणी यामुळेच केवळ व्यवसाय होतो असे नाही, तर यातील थोडेफार घेऊन मुख्य लक्ष्य मानवतेच्यादृष्टीने व्यापक ठेवूनही हे साध्य करता येते. हे अवघड काम निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी आणि प्रमुख कलाकार आमीर खान यांनी कौशल्याने साकारले आहे. मुख्य म्हणजे कोट्यवधी रूपयांचा हा प्रकल्प राबविताना त्यांनी प्रचंड धोका पत्करला आहे. पत्करलाच पाहिजे ही भूमिका त्यामागे आहे. पण, अभिनिवेश नाही. ढोंगाला आणि पिळवणुकीला विरोध आहे. पण, कोणत्याही धर्मश्रद्धेला विरोध नाही. तरीही या चित्रपटाविरोधात आंदोलने होत आहेत. या मानसिकतेला काय म्हणावे ? खरे म्हणजे विवेकाचा गळा घोटण्याच्या वृत्तीनेच मानव समूहाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची जाणीव निदान २१व्या शतकात तरी व्हायला हवी, असे कळकळीने वाटते. या चित्रपटात एक परग्रहस्थ मानव आकाशमार्गे पृथ्वीवर उतरतो. आपल्या निवासी परतण्यासाठी त्याच्याकडे एक रिमोट कंट्रोल आहे. पण, पहिल्याच अनुभवात पृथ्वीवरचा एक माणूस त्याचे रिमोट यंत्र खेचून पळून जातो. त्याच्या शोधात असतानाच त्याला पृथ्वीवरील माणसं, रितीरिवाज, देवदेवतांच्या कल्पना, येथील प्रश्न, आदी समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो. त्याची पाटी कोरी आहे. त्याचमुळे जे जे प्रश्न त्याला पडतात त्याची बालकाच्या निरागसतेने उत्तरे मिळविण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या विक्षिप्त वाटणाऱ्या वर्तनाने त्याला ‘पीके’ (दारू ढोसून आलेला) असे नाव मिळते. प्रार्थनागृहाजवळील तसेच इतर माणसं म्हणतात, त्याचा रिमोट कुठे आहे. देवालाच माहीत. मग तो देवाचा शोध घेऊ लागतो. हा शोध सुरू असतानाच देवाशी संवाद असलेल्या तथाकथित गुरूशी त्याची गाठ पडते. त्यालाच तो रिमोटबद्दल विचारतो. समूहावर अधिराज्य असलेल्या गुरूच्या (बाबांच्या) उत्तरांनी त्याचे समाधान होत नाही. प्रत्यक्ष देवाला कॉल करून हे बाबा लोकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. त्याचे फोलपण लक्षात आल्याने या असल्या कॉल्स्ना तो राँग नंबर ठरवतो. टीव्हीच्या माध्यमातून असे अनेक राँग नंबर्स उघडकीस येतात. बाबा आणि त्याचे भक्त चिडतात व देवालाच आव्हान असल्याच्या अविर्भावात देवाचे रक्षण करण्यासाठी सरसावतात. जो सर्वशक्तिमान आहे, त्याचे रक्षण करणे किती केविलवाणे ढोंग आहे, हे स्थापित करण्यात चित्रपट यशस्वी होतो. ‘पीके’ला बोलावे लागते ते ढोंगाची, फसवणुकीची आणि त्यातून होणाऱ्या पिळवणुकीची चिकित्सा करण्यासाठी. ‘पीके क्यूं बोला?’ याचे इतके साधेसुधे उत्तर आहे. सॉक्रेटीस, तुकाराम, फुले आणि दाभोळकर यांनी चिकित्साच केली म्हणून त्यांना भोगावे लागले. मात्र, पीकेला लोकाश्रय मिळाला आहे, हे समाजमन घडविण्याच्या कामी सूचिन्ह मानावे लागेल. तुकोबांनीच लिहून ठेवलंय : तुका म्हणे चला- घाव निशाणी घातला!
(लेखक इंग्रजी भाषा व साहित्याचे प्राध्यापक आहेत.)
 

Web Title: Why did PK speak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.