खाऊच्या पानांची ‘सुपारी’ घेणार कोण?
By Admin | Updated: August 8, 2014 00:40 IST2014-08-07T22:03:46+5:302014-08-08T00:40:49+5:30
केवळ पूजेलाच मान : बंदी असतानाही गुटखा जोरात; विडा उरला चघळण्यापुरता

खाऊच्या पानांची ‘सुपारी’ घेणार कोण?
सचिन काकडे - सातारा -- भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासूनच खाऊच्या पानांना विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासूनच पांनाचा उपयोग पूजापाठ व खाण्यासाठी केला जात आहे. आज आधुनिक युगातही या पानांचं महत्त्व पूर्वी इतकंच असलं तरी त्याला पर्याय म्हणून विविध प्रकारचे पानमसाले, सुगंधी जर्दामुळे पान खाणाऱ्यांची संख्या घटली आहे. पूर्वी पान खाणं ही शान समजली जायची. त्यामुळे प्रत्येकाकडे कात, सुपारी, चुना, अडकित्ता आणि खाऊच्या पानांचा बंडल असायचा.
काळानुरूप हे चित्र बदलले असून, पान खाणाऱ्यांची संख्याही आता कमी होत चालली आहे. त्यामुळे याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. केवळ सण-समारंभ आणि धार्मिक कार्यावेळीच या पानांना मागणी वाढत आहे. पान औषधी असतले तरी त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणामही होत असतात. खाऊच्या पानांच्या विविध जाती असून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव तालुक्यातही पानाचे मळे आहेत. चांगले उत्पन्न मिळत असल्याने काही शेतकरी गत कितीतरी वर्षांपासून पानमळे पिकवत आहेत.