‘माण’चा मानकरी कोण ठरणार

By Admin | Updated: August 25, 2014 23:25 IST2014-08-25T23:18:06+5:302014-08-25T23:25:13+5:30

रामराजे, शशिकांत शिंदे यांची परस्पर विधाने : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Who will honor Mana? | ‘माण’चा मानकरी कोण ठरणार

‘माण’चा मानकरी कोण ठरणार

सातारा : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची भाषा सुरू असतानाच सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख शिलेदार असलेल्या मंत्री शशिकांत शिंदे आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परस्पर विधाने करून माण आणि खटाव तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून सोडले आहे. परिणामी माण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा मानकरी काँग्रेस की राष्ट्रवादी याकडे अनेकांच्या नजरा आहेत.
विधानसभा निवडणुकांचा बिगुल आता वाजू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आघाडी होणार असल्याचे स्पष्ट करतच जेथे विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे, अथवा ज्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे तो मतदारसंघ त्यांच्याकडेच राहणार, असे नमूद केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहतील, अशी घोेषणा करून नियोजन आयोगाचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अनेकांना कोड्यात टाकले आहे.
मंत्री शिंदे यांची भूमिका लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील आठपैकी फक्त ‘कऱ्हाड दक्षिण’ आणि ‘माण-खटाव’ हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार असे स्पष्ट होते. गतवेळी माण राष्ट्रवादीकडे असताना येथून काँग्रेस बंडखोर जयकुमार गोरे, तर वाई काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी बंडखोर मकरंद पाटील विजयी झाले. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ विजयी पक्षाकडे राहणार आहेत. दरम्यान, या दोघांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीतून इच्छुक असणारे आमदार प्रभाकर घार्गे, सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांच्यासह अनेक इच्छुक गोंधळात पडले असल्याची चर्चा माणच्या राजकीय पटलावर
रंगली आहे. (प्रतिनिधी)
माणची चर्चा सर्वाधिक
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी सर्वाधिक आणि सर्वच पातळ्यांवर माण विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत माण-खटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र, येथून जिल्हा परिषद सदस्य जयकुमार गोरे यांनी माणचे ‘किंगमेकर’ सदाशिवराव पोळ यांना धूळ चारत आमदारकी खेचून आणली होती. यानंतर गोरे यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. वाई मतदारसंघ काँग्रेसकडे होता. मात्र, येथून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी मदन भोसलेंचा पराभव केला. यानंतर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

Web Title: Who will honor Mana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.