‘ब्रेक द चेन’ पण तोडणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:05+5:302021-05-10T04:39:05+5:30
सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे ...

‘ब्रेक द चेन’ पण तोडणार कोण?
सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे नाव घेईना. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले. एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडतेय तर दुसरीकडे नागरिक संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरताहेत, अशी टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, ही आशाही आता फोल ठरू लागली आहे. कोरोनाचे दररोज दोन ते अडीच हजार नवे रुग्ण व सरासरी चाळीस रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे. सद्यस्थितीला सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या तालुक्यांत कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पडू लागले आहेत.
गतवर्षी स्थानिक प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. यामध्ये अंगणवाडी सेविका, शिक्षक, पालिका कर्मचारी आदींच्या समावेश होता. ही पथके गृहभेटीद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करत होती. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झाले नाही. गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात होता. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांनी गावबंदी केली आहे. जिल्हाबंदी असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच अशा व्यक्तीची ना कोणती तपासणी केली जाते, ना कोणत्या नोंदी ठेवल्या जातात. स्वच्छता, निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती अशा बाबींचादेखील प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते.
एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडत असताना, दुसरीकडे नागरिकही शासन नियमांचे पालन करत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. प्रशासन व नागरिकांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढली, ती पाहता जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.
(चौकट)
यामुळे वाढतेय संक्रमण
१. अत्यावश्यक सेवांना वेळेचे बंधन असले तरी अनेक दुकानदार शटर बंद करून दिवसभर सेवा पुरवत आहेत.
२. त्यामुळे बाजारपेठेत नागरिक, वाहनधारकांची दिवसभर रेचलेच सुरू असते. नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही.
३. जिल्ह्यात सध्याच्या घडीला तब्बल १८ हजार कोरोना रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. हे रुग्ण औषधोपचारसह कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत.
४. अशा रुग्णांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक संभवतो.
५. गतवर्षी प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. या माध्यमातून कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झालेले नाही.
६. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही.
७. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संंख्याही अधिक आहे. अशा व्यक्तींच्या नोंदी आता ठेवल्या जात नाहीत.