‘गृहराज्यमंत्र्यांचा पीए’ म्हणून पोलिसांशी बोलणारा ‘तो’ कोण?
By Admin | Updated: November 28, 2015 00:22 IST2015-11-27T22:47:17+5:302015-11-28T00:22:27+5:30
भाजपची चौकशीची मागणी : ‘बीफ’चा ट्रक सोडण्यासाठी बनाव

‘गृहराज्यमंत्र्यांचा पीए’ म्हणून पोलिसांशी बोलणारा ‘तो’ कोण?
लोहोम : ‘बीफ’ घेऊन चाललेला ट्रक सोडून द्यावा, संबंधितांवर कारवाई करू नये,’ असा फोन एका व्यक्तीने शिरवळ पोलिसांना केला. ‘मी गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांचा स्वीय सहायक बोलतोय,’ असे सांगणारा तो तोतया असल्याचे स्पष्ट झाले असून, ‘तो’ कोण होता याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘बीफ’ विक्री करणारे रॅकेट कार्यान्वित असून, शिरवळ हद्दीत पकडलेला दहा टनी ट्रक हा त्याचाच भाग होता, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे. शिरवळच्या पोलीस निरीक्षकांना एका व्यक्तीने फोन करून आपण प्रा. शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगितले. ‘या प्रकरणात लक्ष घालू नका. गाडी सोडून द्या, कारवाई करू नका,’ असे त्या व्यक्तीने सांगितले. तथापि, चौकशी केली असता, हा स्वीय सहायक नसल्याचे समोर आले; त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.इचलकरंजी येथून एका ‘बीफ’ पुरवठादार एजन्सीने अशा प्रकारे अनेकदा ‘बीफ’चा पुरवठा केला आहे, असा आरोप करून सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, एजन्सीच्या माध्यमातून परदेशी व्यापाराच्या बाबतीत काही अनियमितता आहे का, अशा किती एजन्सी बनावट व बेकायदा कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करीत आहेत, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके, निखिल झगडे, चिराल चव्हाण, प्रशांत रेवडीकर, राहुल राऊत, सागर
जरांडे, केदार हाडके आदींनी केली आहे. (वार्ताहर)
मांस वाहतूकप्रकरणी तिघांना कोठडी
शिरवळ : मांस वाहतूकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर दिलावर मुजावर (वय ३८), शकील इब्राहिम पटवेकर (वय ५७, दोघेही रा. इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली) व समीर दिलावर इबुशे (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने शुक्रवारी दि. ३० पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.