देसाई कारखान्यात कारभारी कोण?

By Admin | Updated: April 2, 2016 00:16 IST2016-04-01T22:35:36+5:302016-04-02T00:16:57+5:30

आज अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड : शंभूराज देसार्इंच्या भूमिकेकडे लक्ष

Who is the manager in Desai factory? | देसाई कारखान्यात कारभारी कोण?

देसाई कारखान्यात कारभारी कोण?

पाटण : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय झालेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक दि. २ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत असून, यावेळी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवड होणार आहे. विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या हाती रिमोट कंन्ट्रोल असलेल्या देसाई कारखान्याच्या व्यवस्थापनाचे कारभारी कोण-कोण होणार ही उत्सुकता ताणली गेली आहे. आमदारांनी लखोट्यात कोणती दोन नावे समाविष्ट केली आहेत याबद्दल अंदाज आणि तर्कवितर्क सुरू आहेत.
मरळी शुगर ही जगप्रसिद्ध असणारी पेंटट आणि ट्रेडमार्क्स पाटणच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यातून तयार झालेली आहेत. आजपर्यंत लोकनेत्यांसह कै. शिवाजीराव देसाई, आमदार शंभूराज देसाई यांनी कारखान्याची धूरा सांभाळली आहे.
विरोधकांना थारा न देता देसाई घराण्याची निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची संधी दिली. यामध्ये कै. ज्ञानदेव शिर्के, सध्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप चव्हाण यांचा समावेश आहे. शंभूराज देसाई यांनी सलग १० वर्षांपेक्षा जास्त अध्यक्षपदाचे काम पाहिले.
त्यानंतर १० वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यक्षपदी एकाच व्यक्तीस राहता येत नाही असा नियम झाला. नुकतेच निवडून आलेल्या एकूण १७ संचालकांमध्ये अनेकजण तरुण व प्रथमच संधी मिळालेले कार्यकर्ते आहेत. विरोधकांना एकही जागा मिळविता आलेली नाही. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण? याचा विचार केल्यास देसाई कारखान्यातील कारभार, व्यवस्थापन, कर्मचारी अधिकारी आणि नेता यांची जवळून पारख आणि अभ्यास असणाऱ्या संचालकांमध्ये अशोकराव पाटील (मारुल हवेली), डॉ. दिलीप चव्हाण (कुंभारगाव), या दोघांकडे पाहिले जाते. त्यामुळे कोणाताही धोका न पत्करता आमदार शंभूराज देसार्इंना तर अध्यक्षपद द्यायचे तर दोघांपैकी एकाची वर्णी शक्य आहे.
मात्र, नवीन होतकरू व तरुण नेतृत्वाच्या हाती अध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्याचा धाडसी निर्णय आमदार घेणार असतील तर, निकम, गुरव यांचेकडे बोट दाखविता येईल. अध्यक्षपद हे बघीतले तर नामधारीच असते. अध्यक्ष यांच्या पश्चात उपाध्यक्ष पदाच्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होते.
या पदाबाबत मागील व आताचे काही बरे-वाईट अनुभव विचारात घेतले गेले तर शंभूराज देसाई पुन्हा धोका नको. अशाच व्यक्तींची निवड करतील. यामध्ये बबनराव भिसे असू शकतील. (प्रतिनिधी)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देसाई व्यस्त
२ एप्रिल रोजी कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी तहसीलदार, रवींद्र सबनिस यांच्या नियंत्रणाखाली होणार आहेत. दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंभूराज देसाई मंगळवारी दाखल झाल्याने ते आता व्यस्त आहेत. तरीसुद्धा देसाई कारखाना निवडीसाठी ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Who is the manager in Desai factory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.