भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण?

By Admin | Updated: April 10, 2015 23:33 IST2015-04-10T21:24:22+5:302015-04-10T23:33:40+5:30

राजकीय वातावरण तापले : आताही सदाशिवराव पोळांबरोबर जयकुमार गोरेंची होणार टक्कर...

Who is the 'Mana' of the brother-in-law? | भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण?

भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण?

नितीन काळेल - सातारा  -जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल उतरविण्याचा निर्णय आता घेतला असला तरी दोन महिन्यांपूर्वी माण तालुका मला सेफ आहे, आता खटावमधून जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार, अशी गगनभेदी घोषणा करणारे आमदार जयकुमार गोरे यांनी तलवार न परजताच म्यानातच ठेवली आहे. मागील वेळेप्रमाणेच त्यांनी यंदाही माणमधून सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात मागील उमेदवार व माजी आमदार सदाशिवराव पोळ हेच असणार आहेत. त्यामुळे यंदा तरी गोरेंना बँकेचे दार खुले होणार का, असा प्रश्न आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माण तालुक्यातील इच्छुक खऱ्या अर्थाने कामाला लागले होते. यावर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे माण तालुक्यात निवडणुकीअगोदर बरेच रामायण व महाभारत घडले. यामुळे अनेकांना रक्त सांडावे लागले तसेच जेलची हवाही खावी लागली आहे. त्यामुळे मागील जिल्हा बँक निवडणूक काळात माण तालुका गाजला तशीच यावेळीही परंपरा राखली गेली. गेल्यावर्षी माजी आमदार पोळ व जयकुमार गोरे यांच्यात संघर्ष झाला; पण या वेळचे निवडणुकीतील वातावरण हे सब कुछ दोघा भावांत होते. आमदार गोरे व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनीच विविध गावांच्या सोसायट्या ठरावात आपलेच घोडे पुढे आणले. किंगमेकर समजले जाणारे सदाशिवराव पोळ या ठरावाच्या निमित्ताने कुठेच पुढे आले नाहीत. शेखर गोरे आणि पोळ यांची युती समोर आली.
सोसायटी मतदारसंघातून आमदार पोळ की शेखर गोरे उभे राहणार, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पोळ यांनी अर्ज भरला आहे. शेखर गोरे यांनी इतर मागासवर्ग प्रवर्गातून अर्ज भरला आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून पोळ हेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात आमदार जयकुमार गोरे असणार आहेत. यावेळी निवडणुकीसाठी माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे, पोळ यांच्याबरोबरच मनोजकुमार पोळ, रामचंद्र माने, युवराज बनगर व संजय जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामधील आमदार गोरे आणि सदाशिवराव पोळ या दोघांचाच अर्ज अंतिम असणार आहे. इतर सर्वजण अर्ज मागे घेणार हे निश्चित आहे. त्यामुळे लढत होणार आहे ती आमदार गोरे आणि पोळ यांच्यातच.
बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आमदार गोरे यांनी माण तालुका मला सेफ आहे. खटावमधून निवडणूक लढणार, अशी घोषणा केली होती; पण त्या घोषणेला कुठे तरी सुरूंग लागला आहे. तलवार न उगारताच त्यांना ती म्यानातच ठेवावी लागली आहे. आताची निवडणूक मागीलप्रमाणेच सदाशिवराव पोळ व आमदार गोरे यांच्यात होणार जवळपास स्पष्ट आहे. मागीलवेळी पोळ यांनी आमदार गोरे यांना पराभव पाहायला लावला होता. यंदाही पोळ पुन्हा नव्या जोमाने उतरणार आहेत. त्यांना विजयाचा विश्वास आहे. दुसरीकडे आमदार गोरे यांनी जोरदार तयारी केली आहे. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी डावपेच आखण्यास प्रारंभ केला आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्यातरी माणमधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.


पोळ प्रथमच राहिले पडद्याआड...
माण तालुक्याचा राजकीय इतिहास लिहायचा झाला तर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना कदापिही डावलता येणार नाही. दहा-वीस नव्हे तर तब्बल ४० वर्षे तालुक्यावर त्यांनी हुकूमत ठेवली. अलीकडील काही वर्षांत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटी ठरावाच्या निमित्ताने पोळ कुठेही समोर आले नाहीत. पडद्याआडून त्यांनी सारी सूत्रे हलविली. प्रथमच पोळ यांनी अशी भूमिका वठविल्याचे यावेळी दिसून आल्याचे राजकारणातील जाणकार सांगतात.



तात्यांची इच्छा लपून राहिली नाही...
माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे यांच्याविरोधात पोळ तात्या की शेखर गोरे असणार, असा संभ्रम होता. दोघेही इच्छुक होते. त्यातच गेली ४३ वर्षे संचालक असणारे सदाशिवराव पोळ यांची इच्छा मात्र कधीच लपून राहिली नव्हती. प्रत्येकवेळी मी इच्छूक आहे, असे ते सांगायचे. त्यामुळे तात्या पुन्हा एकदा मैदानात असणार, हे जवळपास सिद्ध झाले आहे.

Web Title: Who is the 'Mana' of the brother-in-law?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.