कऱ्हाडात गरिबांना कुणी घर देता का घर..?
By Admin | Updated: October 8, 2015 22:22 IST2015-10-08T22:22:21+5:302015-10-08T22:22:21+5:30
दीडशे झोपडपट्टीधारक घरकूलच्या प्रतीक्षेत : नावावर असूनही मिळेना घर; स्थायी समितीच्या बैठकीकडे लक्ष, सहा इमारतींचे काम पूर्ण

कऱ्हाडात गरिबांना कुणी घर देता का घर..?
कऱ्हाड : घर नावावर असूनही त्यामध्ये राहायला मिळत नसेल तर काय अवस्था होते, हे त्या घरमालकालाच माहीत. सध्या अशीच अवस्था कऱ्हाड येथील रुक्मिणीनगर झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या १५२ घरकूल लाभार्थ्यांची झाली आहे. गलिच्छ वस्तीत राहत असलेल्या रुक्मिणीनगरमधील झोपडपट्टीधारकांच्या नावावर घरकूल प्रकल्पातील खोल्या असूनदेखील निव्वळ स्थायी समितीच्या बैठकीअभावी व घोषणेअभावी त्यांना त्या खोल्या मिळू शकलेल्या नाहीत.
नावावर खोल्या असूनही आपल्या हक्काच्या घरात राहायला मिळत नसल्याची परिस्थिती त्यांच्या नशिबी आली आहे. नगरसेवकांकडून महिन्यातून एकदा घेतल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यशासनाच्या घरकूल अभिनव योजनेतून कऱ्हाड पालिके ने कऱ्हाड ग्रामीणच्या हद्दीत असलेल्या जागेत हा प्रकल्प २००९ मध्ये उभा करण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी निधी कमी पडल्याने पुढे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यानंतर कालांतराने प्रकल्पास निधी मिळाल्याने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले. घरकूल प्रकल्पाचे काम सध्या पूर्ण झाले आहे. सध्या हा घरकूल प्रकल्प बारा डबरी परिसरात पूर्ण करण्यात आला असून, या ठिकाणी ६ इमारती बांधण्यात आल्या आहेत. तर या इमारतीमध्ये १५२ सुसज्ज अशा खोल्या देखील लाभार्थ्यांसाठी बांधण्यात आल्या आहेत. पालिकेतर्फे पात्र लाभार्थ्यांना ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या घरकूल प्रकल्पातील खोल्यांचे वाटप करण्यात येणार होते. या सभेमध्ये लाभार्थ्यांच्या नावावर कोणती खोली देण्यात येणार, त्याबाबत निर्णय घेऊन त्याची घोषणा केली जाणार होती. मात्र, या मासिक सभेवेळी घरकूल वाटपाबाबतचा विषय बाजूला ठेवला गेला व इतर विषयांवरच चर्चा करण्यात आली. त्यामुळे सभेत १५२ झोपडपट्टीधारकांच्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित राहिला.
तब्बल साडेआठ वर्षे काम सुरू असलेल्या घरकूलच्या सहा इमारती आता पूर्ण झाल्या असून, त्या शहरातील रुक्मिणीनगर येथील १५२ झोपडपट्टीधारकांना कधी मिळणार अशी विचारणा येथील लाभार्थ्यांकडून होत आहे. मात्र, याबाबत नगराध्यक्षांसह नगरसेवकही तत्काळ निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी येथील लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
सुमारे साडेतीन कोटी खर्च करून बाराडबरी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीशेजारी सहा इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. शहरातील ग्रामीण हद्दीत राहत असलेल्या गरीब लाभार्थी कुटुंबांचा पालिकेने २००९ मध्ये सर्व्हे केला होता. त्यातून १५२ लाभार्थ्यांची निवडही केली होती. २००९ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेतून निवडलेल्या लाभार्थ्यांना बाराडबरी परिसरात बांधण्यात येणाऱ्या घरकूल प्रकल्पाचा लाभ दिला जाणार हे त्यावेळी पालिकेकडून लाभार्थ्यांना सांगण्यात आले होते. पालिकेने २००९ मध्ये सुरू केलेल्या घरकूल प्रकल्पाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. एकूण १५२ खोल्या असलेल्या ६ इमारतींमध्ये १५२ लाभार्थ्यांना खोल्यांचे वाटप कधी करण्यात येणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
पालिकेकडून बांधण्यात आलेल्या घरकूल प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये प्रकल्पासाठी १५२ लाभार्थ्यांची निवडही करण्यात आली आहे. मात्र, अजूनही स्थायी समितीची बैठक झाली नसल्याने लाभार्थ्यांच्या खोल्या वाटपाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
- प्रशांत रोडे, मुख्याधिकारी , नगरपालिका, कऱ्हाड
फक्त प्रतीक्षा : लाभार्थ्यांना तारीख पे तारीख !
गेली अनेक वर्षांपासून बाराडबरी, रुक्मिणीनगर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छ वातावरण, दुर्गंधीचे साम्राज्य यातून लवकरच आपली सुटका होणार व आपल्या हक्काच्या घरकुलात आपण राहायला जाणार, या आशेने अजूनही लाभार्थी प्रतीक्षेत राहिले आहेत. मात्र, त्यांना दरवेळी फक्त नवीन तारीख ऐकावयास मिळत आहे.
खोल्या अद्यापही रिकाम्याच
पालिकेने शहरातील बाराडबरी परिसरात सुमारे साडेतीन कोटी खर्च करून ‘घरकूल प्रकल्प’ निर्माण केला आहे. या प्रकल्पात सहा इमारती असून, त्यामध्ये १५२ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पातील खोल्या या लाभार्थ्यांना वाटपाविना मोकळ्या पडून राहिलेल्या आहेत.