सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ?

By Admin | Updated: October 21, 2014 00:20 IST2014-10-20T23:25:52+5:302014-10-21T00:20:45+5:30

जिल्ह्याचे लक्ष : शंभूराज, तावडे, बापट यांच्या नावांची चर्चा

Who is the Guardian Minister of Satara district? | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ?

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण ?

सातारा : महाराष्ट्रात भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर थोड्याच दिवसांत पालकमंत्रीही नियुक्त केले जाणार आहेत. परिणामी सातारचे पालकमंत्री कोण, याची चर्चा आतापासूनच जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.
जर भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तर पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारच्या पालकमंत्रिपदाची माळ बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद तावडे यांच्या गळ्यात /पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील ‘कसबा पेठ’ विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश बापट यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, त्यांनी पुण्याचे पालकमंत्री होण्यात रस दाखविला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार भाजपचेच असणार आहे. भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना अजूनही बहुमतासाठी काही जागा आवश्यक आहेत. भाजप जागांची जुळणी करत आहे. त्यात यश येईल, असे वरिष्ठ नेत्यांना वाटते. मात्र, राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपचीही एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कालावधीत त्यांनी अनेकदा सातारा जिल्ह्णात सभा, दौरे आणि बैठका केल्या आहेत. परिणामी त्यांना सातारा जिल्ह्णाची संपूर्ण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नाडी चांगलीच अवगत झाली आहे. जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचा पालकमंत्री आक्रमक असायला हवा, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरत असून, त्यादृष्टीने विनोद तावडे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.

भाजपला विनोद तावडेच का हवेत..?
भाजपला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चांगला शिरकाव करता आला. मात्र, सातारची पाटी त्यांच्यासाठी कोरीच राहिली आहे. काही केल्या भाजपला येथे पाय रोवता आलेले नाहीत. त्यातच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बहुतांशी सत्तास्थाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. परिणामी सातारचा पालकमंत्री राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडणारा हवा, असे स्थानिक भाजप नेत्यांना वाटते. त्यातच, जिल्ह्णात त्या तुलनेत भाजप प्रभावी नाही. त्यामुळे भाजप वाढवायची असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर सातारचे पालकमंत्री म्हणून विनोद तावडे यांच्याच नावाचा विचार करावा, अशी मागणी भाजपमधून पुढे आली आहे.

Web Title: Who is the Guardian Minister of Satara district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.