वेगाला ब्रेक लावणार कोण?
By Admin | Updated: December 29, 2014 23:54 IST2014-12-29T22:23:57+5:302014-12-29T23:54:34+5:30
अजब टोलवाटोलवी : वेगमर्यादेचे फलक बसविण्यावरून पालिका-वाहतूक शाखेत मतभिन्नता

वेगाला ब्रेक लावणार कोण?
सातारा : सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी बेफाम धावणाऱ्या तरूणांच्या गाड्यांना आता वेगमर्यादेचे बंधन घालणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी पालिका आणि वाहतूक शाखा यांच्यातील टोलवाटोलवी आता अनेकांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा शहरात सकाळी आणि संध्याकाळी प्रमुख रस्त्यांसह शाळा आणि कार्यालय परिसरात वाहनांची वर्दळ असते. शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केवळ एकेरी वाहतुकीपुरतेच झाले. मात्र, त्यामुळे वाहतुकीत सुरळीतपणा अजूनही दिसत नाही. कित्येकदा संध्याकाळी निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळेआधी अर्धा तास निघावे लागते. महानगरांप्रमाणे साताऱ्यातही वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीचे नियोजन होणे अत्यावश्यक बनले आहे.
अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याचे कारण पुढे करत वाहनचालक छोट्या बोळातून मार्ग काढत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. वाहतूक पोलीसही अनेकदा किरकोळ भाजीविके्रते आणि हातगाडीचालकांवर कायद्याचा बडगा उगारतात; पण सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाहीत.
राज्यातील अनेक शहरांमध्ये कायम वर्दळीच्या ठिकाणी वेगमर्यादेचे फलक बसविण्यात आले आहेत. सातारा शहरात मात्र हे काम कोणाचे, या कारणावरून वेगमर्यादेचे फलकच लावले गेले नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांना आधारच मिळत नाही, अशी स्थिती
आहे. (प्रतिनिधी)
संध्याकाळच्या वेळी तरूणाई अत्यंत बेफामपणे वाहने चालवत असते. अशा वेळी ज्येष्ठांसह सर्वांचेच जीव घाबरेघुबरे होतात. तरूणांच्या या वेगाला मर्यादा घालण्यासाठी त्यांना समज देणे आवश्यक आहे. कित्येकदा मुलींच्या मागे जाण्याच्या नादात तरूणांचे अपघात झाले आहेत.
- सुभाष जाजू ,
ज्येष्ठ नागरिक
वाहतूक शाखा अन् पालिकेची टोलवाटोलवी
वाहतूक विभाग वाहनांवर कारवाई करून जो दंड वसूल करते त्यातील निम्मी रक्कम पालिकेच्या खात्यावर वर्ग होत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावरील नियंत्रणाची जबाबदारी पालिकेचीही असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलीस म्हणतात, सूचनाफलक लावण्याचे काम पालिकेचे आहे, तर वाहतुकीची कोंडी कुठे आणि कशी होते याची माहिती पोलिसांना असताना आम्ही कसे फलक लावणार, असा बचाव पालिका करते. विशेष म्हणजे वाहतुक शाखा आणि पालिका यांच्यात याविषयी पत्रव्यवहारही झाला आहे. पण त्यावर कार्यवाही कोणतीच झाली नाही.
तरूणांवर निर्बंध आवश्यक
सध्या अनेक तरूणांच्या हातात अधिक क्षमतेच्या बाईक्स आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण वाऱ्याशी स्पर्धा करण्याची ऊर्मी मनात ठेवूनच वाहनावर बसतो.
काहीवेळा ‘शायनिंग’साठी तर कधी कोणाला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी स्टंटबाजी चालते. संध्याकाळी सातनंतर वाहतूक पोलीस नसल्यामुळे बेलगाम तरूणाई आपल्याच नादात असते. कित्येकदा कट देण्याच्या नादात या तरूणाईने स्वत:चे आणि इतरांचेही शारीरिक नुकसान केले आहे.
या तरूणाईवर निर्बंध ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही साध्या वेशात गस्त घालून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.
वर्दळीची ठिकाणे
राजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठ चौक, शनिवार चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, जुना दवाखाना, शाळा आणि महाविद्यालय परिसर, एकेरी वाहतुकीची ठिकाणे, रूग्णालय परिसर.