विलासराव उंडाळकरांविरोधात नक्की कोण ?

By Admin | Updated: April 23, 2015 00:42 IST2015-04-22T22:39:33+5:302015-04-23T00:42:41+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : विरोधी उमेदवार निश्चित होईना

Who is against Vilasrao Unadkalkar? | विलासराव उंडाळकरांविरोधात नक्की कोण ?

विलासराव उंडाळकरांविरोधात नक्की कोण ?

प्रमोद सुकरे- कऱ्हाड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक दि. ५ मे रोजी होत आहे. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, त्यांच्या विरोधात जरी चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्षात उंडाळकरांच्या विरोधात रणांगणामध्ये कोण उतरणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
गत महिनाभर जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. म्हणून तर कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांची उमेदवारी राष्ट्रवादीनेच निश्चित केल्याचे मानले जाते. त्यांच्याविरोधात सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे यांच्यासह दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचे बंधू धनाजी पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील व दत्तात्रय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत खरे; पण उमेदवारी निश्चित नसल्याने कोणीच प्रचारात सक्रिय दिसत नाही.
कऱ्हाड तालुक्यात सोसायटी मतदारसंघात १४४ मतदार आहेत. तर कऱ्हाड दक्षिण, उत्तर आणि पाटण अशा तीन विधानसभा मतदारसंघांत तालुक्याचे कार्यक्षेत्र विखुरलेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी उंडाळकरांनी चांगल्या प्रकारे केलेली दिसते. गावोगावच्या विकास सोसायट्यांचे ठराव आपल्याच कार्यकर्त्यांचे कसे होतील, यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले. तर उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांनीही त्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे उंडाळकर विरुद्ध बाळासाहेब, असा सामना रंगणार का, याबाबत साऱ्यांना उत्सुकता होती. परंतु, बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी मतदार संघातून अर्जच दाखल केलेला नाही. त्यांचे समर्थक मानसिंगराव जगदाळे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पाटील व धनाजी पाटील यांचेही अर्ज भरले आहेत. नुकतीच झालेली सह्याद्री कारखान्याची निवडणूक पाहता राष्ट्रवादीने जरी उंडाळकरांना उमेदवारी दिली तरी बाळासाहेब पाटील व समर्थक त्यांना मदत करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे उंडाळकरांच्या विरोधात नक्की उमेदवार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा आहे. उंडाळकरांच्या विरोधात कऱ्हाड दक्षिण, उत्तर की पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणारा कऱ्हाड तालुक्यातील उमेदवार उभा राहणार, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.


बाळासाहेबांच्या उमेदवारीवरच अवलंबून
कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सोसायटी मतदारसंघाऐवजी कृषी प्रक्रिया मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कृषी प्रक्रिया मतदार संघातून फलटणचे दादाराजे खर्डेकर प्रमुख दावेदार आहेत. तर बाळासाहेब पाटीलही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. बाळासाहेबांनी सध्या थांबावे, यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते; पण बाळासाहेब ‘राजी’ न झाल्यास त्यांची ‘नाराजी’ प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून दिसेल, असे बोलले जाते. त्यांच्या उमेदवारी निश्चितीनंतरच कऱ्हाड दक्षिणचा सोसायटी मतदार संघातील उंडाळकरविरोधी उमेदवार निश्चित होईल, असे बोलले जाते.

Web Title: Who is against Vilasrao Unadkalkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.