कोरानाकाळात आमचं ठरलंय टीम कुठे आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:08+5:302021-05-11T04:41:08+5:30
वडूज : खटाव-माण तालुक्यातील गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण व खटाव तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येऊन एक वेगळी विकासात्मक दिशा ...

कोरानाकाळात आमचं ठरलंय टीम कुठे आहे?
वडूज : खटाव-माण तालुक्यातील गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण व खटाव तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येऊन एक वेगळी विकासात्मक दिशा देऊ इच्छित होते. त्यांच्या या निर्णयाला दोन्ही तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. असा एकोपा फार क्वचित राजकारणात पहावयास मिळतो. दोन्ही तालुक्यांचा विकास साधण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ या घोषवाक्याखाली एकत्रित आलेली राजकीय दिग्गज मंडळी कोरोनाकाळात तुरळक दिसत असल्याने तालुक्यातील जनतासुद्धा ही टीम कुठे आहे, असा आर्त सवाल करताना दिसून येत आहे.
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई ही विविध पक्षांतील दिग्गज मंडळी खटाव-माण तालुक्याचा खुंटलेला विकास साधण्यासाठी एकत्रित आली. गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार देऊन निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी सर्वांनी केलेला होता. ठरलंय टीमची एकी पाहून भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. दोन्ही तालुक्यांतील नेत्यांच्या एकत्रितपणाचे लोकांनीही स्वागत केले; परंतु ही एकी राजकारणापुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या खटाव तालुक्यात आजअखेर १०,१४७ रुग्ण कोरोनाने बाधित होते. यापैकी ८,१६८ रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये २८० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १,६९९ बाधित रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. १,२८९ बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, १९४ बाधित रुग्ण पुसेगाव, पडळ व खटाव येथे कोरोना केअर सेंटरला उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून, खटाव तालुक्यातही बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील जनतेला लोकप्रतिनिधींनी पोकळ दिलासा देण्याऐवजी काहीही दिलेले नाही, ही बाब खेदजनक असून, येथील लोकांना वार्यावर सोडल्याची चर्चाही रंग भरू लागले आहे. अशावेळी राजकारणापुरते एकत्रित येणारी मंडळी सध्या कुठे आहे, याचा तपास येथील जनता करू लागली आहे. निवडणुकीदरम्यान मोठमोठाल्या गप्पा मारणारे हे नेतेमंडळी आता या महामारीदरम्यान मूग गिळून गप्प का, असा आर्त सवाल ही जनतेतून उमटत आहे.
(चौकट)
सवता सुभा....
‘आमचं ठरलंय’मधील माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व माजी सभापती संदीप मांडवे यांनी ‘एकला चलो रे’ या धर्तीवर दिवस-रात्र एक करून बाधित रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक गावागावांत होम आयसोलेशनसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वास्तविक पाहता या टीमने एकत्रित या महामारीला तोंड दिले तर हेही संकट चुटकीसरशी सुटले असते. या सवत्या सुभ्यामुळे या टीममध्ये दुफळी निर्माण झालेली दिसत आहे.
आयकार्ड फोटो: डाॅ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई