बंधाऱ्यातील पैसा मुरला कोठे?
By Admin | Updated: August 27, 2014 23:31 IST2014-08-27T21:24:04+5:302014-08-27T23:31:26+5:30
शेखर गोरे : माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुंबईकरांचा कळंबोळीत मेळावा उत्साहात

बंधाऱ्यातील पैसा मुरला कोठे?
म्हसवड : ‘माण महोत्सव भरवून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा पैसा येतो कोठून याचाही विचार करण्याची गरज आहे. माण-खटाव तालुक्यांत साखळी सिमेंट बंधारे बांधले गेले. आघाडी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु सिमेंट बंधाऱ्यांपैकी ८० टक्के बंधारे गळके आहेत. हा पैसा कुठे मुरला, याचाही विचार माण-खटावच्या जनतेने केला पाहिजे,’ असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी केले.
कळंबोळी, नवी मुंबई येथे माणदेशी माणसांच्या मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास उपस्थित मंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करत शेखर गोरे यांचे स्वागत केले.
गोरे म्हणाले, ‘२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांना आमदार केले. ते दोन वर्षांत माण-खटावला पाणी आणले नाही तर राजीनामा देणार होते, दिला का राजीनामा? माण-खटाव तालुक्यांतील जे लोक मुंबईला कामाच्या शोधासाठी येतात. त्यांची राहण्याची व अंघोळीची सोय नसते. प्रसंगी त्यांना फूटपाथवर झोपण्याची वेळ येते. त्यासाठी मी माण-खटावच्या लोकांची सोय व्हावी, यासाठी दोन कोटी खर्च करून प्रशस्त ‘माण-खटाव भवन’ बांधून देण्याचा निर्धार केला आहे.’
‘खासदार राजू शेट्टी बाहेरून येऊन शेतकऱ्यांना संघटित करून उसाला जादा दर मिळवून देत असले तर माण-खटावच्या पाणीप्रश्नासाठी जनतेचा रेटा उभा करून हा पाणीप्रश्न सोडवणार आहे.
त्यावेळी तुम्ही मुंबईकरांच्या सहकार्याची गरज आहे. पाणीप्रश्नासाठी मी शासनास विनंती करणार आहे. तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी भू-संपादन केल्या आहेत. त्यांची भरपाई द्या. तांत्रिक अडचणी दूर करा, शंभर कोटी खर्चून माण-खटावला पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही,’ असेही शेखर गोरे यांनी आश्वासन दिले.
गोरे म्हणाले, ‘माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर मंडळी व तरुणांनी मला कळंबोली येथे बोलावून मेळावा घेतला. तो यशस्वीही झाला. मेळाव्यास अडीच ते तीन हजार माणदेशी मंडळी उपस्थित होते. याची विरोधकांनी मोबाइलवरून खातरजमाही केली आहे; पण आपल्या उपस्थितीमुळे माझ्या हितचिंतकांची तोंड बंद केले आहे.’ (प्रतिनिधी)