सल्या कोठे होता...चौकशी केली नाही -संजय पाटील खून खटला :
By Admin | Updated: August 26, 2014 22:52 IST2014-08-26T22:50:32+5:302014-08-26T22:52:17+5:30
संभाजी पाटलांची साक्ष;तडीपारभंगाबद्दल केली होती कारवाई

सल्या कोठे होता...चौकशी केली नाही -संजय पाटील खून खटला :
सातारा : ‘संजय पाटील यांचा खून झाला, त्यावेळी सल्या चेप्या कोठे होता, याची आपण चौकशीच केली नव्हती,’ अशी धक्कादायक माहिती तत्कालीन तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनी उलटतपासणीत दिली. तथापि, ‘तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल सल्या चेप्यावर आपण कारवाई केली होती; मात्र त्याची तारीख आठवत नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याच्या सुनावणीत तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांची उलटतपासणी मंगळवारी घेण्यात आली. अॅड. श्रीकांत जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, ‘खुनाची घटना घडली तेव्हा सल्या चेप्यावर तडीपारीचा आदेश होता. सल्याच्या घरझडतीत पैसे सापडले. ते पैसे गाडीच्या व्यवहारातून मिळाले असल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. संजय पाटील यांचा खून झाल्यानंतर सागर परमारचे नाव संशयित म्हणून चर्चेत आले. एका व्यक्तीने परमारचे नाव आम्हाला सांगितले होते. मात्र, त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती घेतली नाही. त्यामुळे ती व्यक्ती कोण होती, हे माहीत नाही. या खून प्रकरणाचा तपास मी केला असला तरी माझ्या अपरोक्ष पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याविषयी स्टेशन डायरीत नोंद आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घटनेविषयी माहिती देणारे कोणी भेटले नाही. संजय पाटील यांच्या गाडीवरील चालक राजेंद्र पवार याला त्याच दिवशी माहिती घेण्यासाठी बोलावले नाही. घटनास्थळी चप्पलचा जोड सापडला; मात्र त्याच्यावर रक्त नव्हते. संजय पाटील यांच्या कुटुंबाने कोणाबरोबर वैमनस्य होते, याची माहिती सांगितली नाही. बाजार समितीच्या निवडणूक कालावधीत उदयसिंह पाटील अथवा आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात कसलीही तक्रार नव्हती.’(प्रतिनिधी)
तपासी अधिकाऱ्याचे अज्ञान
संभाजी पाटील म्हणाले, ‘संजय पाटील यांच्या शरीरात तीन गोळ्या सापडल्या.’ यावर ‘त्यांच्या शरीरात आणखी गोळ्या आहेत का, यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हलगर्जीपणा केल्याचा तुमच्यावर आरोप आहे,’ असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगताच संभाजी पाटील म्हणाले, ‘या खटल्यातील तपासी अधिकाऱ्याचे अज्ञान आणि सरकारी वकिलांनी दाखविलेल्या कागदपत्रांमुळेच माझ्यावर हा आरोप केला गेला; परंतु तो सत्य नाही.’