कधी कोरेगाव,किन्हई तर कधी महाड!
By Admin | Updated: August 14, 2015 00:17 IST2015-08-13T22:22:44+5:302015-08-14T00:17:20+5:30
क्राईम डायरी-- पाच महिने गुंगारा : खुनातील मुख्य संशयिताने सातत्याने बदलली ठिकाणे

कधी कोरेगाव,किन्हई तर कधी महाड!
सातारा : कधी तो रहिमतपुरात असल्याची ‘टिप’ मिळायची, तर कधी किन्हईमध्ये. कधी तो थेट महाडला असल्याची माहिती मिळायची. कधी तो साताऱ्यात असायचा, तर कधी कोरेगावात. परंतु पोलीस त्या ठिकाणी पोहोचायच्या काही मिनिटे आधीच तो तिथून पसार झाल्याचे समजत असे.बजरंग गायकवाड खून प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय लालासाहेब पवार याने सुमारे पाच महिने सतत जागा बदलून पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर आणि एकदा तर पोलिसांच्या तावडीतूनही पलायन केल्यानंतर गुरुवारी सकाळी तो पुन्हा जाळ्यात सापडला. त्याचा माग काढण्यासाठी तालुका पोलिसांनी प्रयत्नांत सातत्य ठेवले होते. अक्षय केवळ जागाच बदलत नव्हता, तर मोबाइल फोनही तो वारंवार बदलत होता. त्याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात खुनाव्यतिरिक्त जबरी चोरीचाही गुन्हा दाखल आहे.
तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी अक्षयची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तशी व्यूहरचना केली. कोरेगाव तालुक्यात, विशेषत: रहिमतपूर परिसरात अक्षयचे ‘नेटवर्क’ मोठे असल्याचे दिसून आले होते. अटक करण्यात आलेले काही संशयितही रहिमतपूर, अंभेरी परिसरातील आहेत. त्यामुळे तेथे तो वारंवार जाण्याची शक्यता होती. तेथील माहिती मिळत राहावी, यासाठी सापळा रचण्यात आला. ही जबाबदारी सचिन भोसले या कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली आणि त्यांनी ती चोख पार पाडली. अक्षय रहिमतपुरात असल्याची ‘टिप’ वेळेवर मिळाली. बुधवारी रात्रभर चाललेल्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, संभाजी गबाले, संदीप पाटील, गोकूळ बोरसे, धनंजय जाधव यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
3 2 1 असा सापडला अक्षय...
बुधवारी रात्री साडेबारा वाजता तालुका पोलिसांना वाई पोलिसांचा दूरध्वनी आला. ‘अक्षय पवार कसा दिसतो, हे आम्हाला माहीत नाही. त्याचा फोटो पाठवा,’ असे सांगण्यात आले. फोटो मिळाल्यानंतर तशा वर्णनाचा युवक वाई परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तालुका पोलिसांची एक टीम तिकडे रवाना झाली. तथापि, तो अक्षय नव्हता.
रात्री अडीच वाजता पुन्हा फोन आला. अक्षय मेढा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी एक टीम तिकडे पाठविली. अक्षय मेढ्यात होता; मात्र काही तासांपूर्वीच तो तिथून निघून गेल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अक्षय रहिमतपुरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलिसांनी दोन टीम तयार केल्या. एक टीम पुढे गेली आणि मागून काही मिनिटांच्या अंतराने दुसरी टीम रवाना झाली. पुढील टीममध्ये तीन कर्मचारी होते. समजलेल्या ठिकाणी अक्षय दिसताच तिघांनी त्याला पकडले, तेव्हा साडेसहा वाजले होते.