‘हेल्पलाइन’च जेव्हा ‘हेल्पलेस’ होते..

By Admin | Updated: November 25, 2015 00:37 IST2015-11-24T23:57:22+5:302015-11-25T00:37:06+5:30

सुरक्षा महिलांची : संकटकाळात मदत मागितल्यास तक्रारदाराचा होतोय ‘फूटबॉल’%%स्टिंग आॅपरेशन

When the helpline was 'Helpless'. | ‘हेल्पलाइन’च जेव्हा ‘हेल्पलेस’ होते..

‘हेल्पलाइन’च जेव्हा ‘हेल्पलेस’ होते..

सातारा : कौटुंबिक हिंसाचार, जाचहाट, शारीरिक छळ, शोषण अशा राक्षसांचे भय जिल्ह्यातील महिलांना वाटू नये, यासाठी पोलिसांतर्फे सुरू केलेली ‘हेल्पलाइन’ चाचपडत उत्तरे देत असल्याचा अनुभव ‘लोकमत टीम’ला आला. आणीबाणीच्या वेळी ही ‘हेल्पलाइन’ कुचकामी ठरण्याचीच शक्यता अधिक असून, ‘इकडे फोन करा,’ ‘तिकडे तक्रार नोंदवा,’ असे सांगून तक्रारदाराचा ‘फूटबॉल’च करायचा असेल, तर ‘हेल्पलाइन’ हवीच कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे.
२५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्त महिलांना सुविधा पुरविण्यासाठी पोलिसांकडून देण्यात आलेल्या ‘१०९१’ या ‘हेल्पलाइन’ची खरंच काही ‘हेल्प’ होते का, याबाबत ‘लोकमत टीम’ने स्टिंग आॅपरेशन केले. अडचणीत असणाऱ्या महिलेला कमीत कमी वेळात आपल्यावरील अन्यायाची माहिती द्यावी लागते. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलेवर सतत घरच्यांची पाळत असते. अशा महिलेला या ‘हेल्पलाइन’चा अजिबात उपयोग नाही, असे ‘लोकमत टीम’च्या निदर्शनास आले.
सोमवारी संध्याकाळी आठनंतर ‘१०९१’ क्रमांक डायल केला असता, सातारा पोलीस कंट्रोल रूममध्ये लागला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तो उचलला. ‘आमच्या नातेवार्इ$क महिलेसंदर्भात तक्रार द्यायची होती,’ असे सांगताच महिला कर्मचाऱ्याने ‘एलसीबीत (गुन्हे शाखेत) तक्रार नोंदवा,’ असे उत्तर दिले.
‘संबंधित महिला नातेवाईक साताऱ्यातील नसून, तिला घराबाहेर पडता येत नाही म्हणून आम्ही ‘हेल्पलाइन’ला कॉल केला आहे,’ असे महिला कर्मचाऱ्यास सांगितले असता, २३३९२३ हा ‘एलसीबी’चा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. तसेच ‘टर्मिनलचा नंबर’ म्हणून आणखी एक क्रमांक देण्यात आला.
त्यानंतर ‘लोकमत टीम’ने गुन्हे शाखेशी वरील क्रमांकावर संपर्क साधला. ‘हेल्पलाइन’मधून हा नंबर दिला असून, आम्हाला तक्रार द्यायची आहे,’ असे सांगितले. परंतु ‘कंट्रोल रूमशी संपर्क साधा,’ असे उत्तर ‘एलसीबी’तून देण्यात आले. ‘हेल्पलाइन’साठी तेथेच स्टाफ पुरविण्यात आला असून, हे पथक खास महिलांसाठीच आहे, असेही सांगण्यात आले. (लोकमत टीम)


त्रोटक उत्तरे...
‘हेल्पलाइन’ सुरू आहे; मात्र ती ‘हेल्पलेस’ आहे, असे स्पष्ट झाल्यानंतर या ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून वर्षभरात किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याबाबत माहिती ‘एलसीबी’कडे विचारण्यात आली. मात्र, तेथून पुन्हा ‘कंट्रोल’ला (नियंत्रण कक्षात) संपर्क साधण्यास सांगण्यात आले. ‘कंट्रोल’मधील ‘१०९१’ क्रमांकावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्रोटक उत्तरे मिळत असल्याने या ‘हेल्पलाइन’मुळे खरेच कुणाला ‘हेल्प’ झाली आहे का, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: When the helpline was 'Helpless'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.