कऱ्हाड पालिकेच्या रुग्णवाहिकेचे घोडे अडलंय कशात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:22+5:302021-04-02T04:40:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : गतवर्षी कोरोना महामारी संकट आल्यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड व मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी ...

कऱ्हाड पालिकेच्या रुग्णवाहिकेचे घोडे अडलंय कशात?
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : गतवर्षी कोरोना महामारी संकट आल्यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड व मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी निधी दिला. त्यानंतर मलकापुरात रुग्णवाहिका धावू लागली. पण, कोरोनाची दुसरी लाट सुरू होऊनही कऱ्हाडात मात्र पालिकेने रुग्णवाहिका खरेदी केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनीही संताप व्यक्त केला. त्यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिकेचं घोडं नेमकं अडलंय कशात? याबाबत शहरवासीयांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
कऱ्हाड शहर व तालुक्यात कोरोनाचे संकट आल्यावर मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढले होते. रुग्णांना बेड मिळेनात, रेमडीसिव्हीर इंजेक्शनची टंचाई, मृत व्यक्तिंची संख्या जास्त, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटिंग अशी सगळी भयावह परिस्थिती कऱ्हाड शहर व तालुक्यात निर्माण झाली होती. ही परिस्थिती ध्यानात घेऊन रुग्णांना आणण्यासाठी पालिकेकडे रुग्णवाहिका नाही ही अडचण समजून घेत, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड व मलकापूर या दोन नगरपालिकांना रुग्णवाहिकेसाठी निधी दिला. त्यातील मलकापूर नगरपालिकेने तत्काळ ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून रुग्णवाहिका खरेदी केली. तिचा वापरही आज सुरू आहे.
कऱ्हाड पालिकेलाही रुग्णवाहिकेसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पण त्याचा विनियोग मात्र आजही झालेला दिसत नाही. याचे नेमके कारण नागरिकांना समजू शकलेले नाही. दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर बैठकीत कऱ्हाड पालिकेच्या रुग्णवाहिका खरेदीचा मुद्दा समोर आला. रुग्णवाहिका अजून का खरेदी केली नाही? असा प्रश्न आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला. पण यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यावर संतापलेल्या चव्हाणांनी तुम्हाला सदरचा निधी नको असेल तर तसा ठराव मला करून द्या. मी तो निधी अन्यत्र वळवतो. दुसरे तरी एखादे विकासकाम होईल, अशी भावना व्यक्त केली.
वास्तविक विकासकामांचा निधी मिळवताना खूप कसरत करावी लागले. परंतु, कऱ्हाड पालिका मिळालेला विकासनिधी वेळेत वापरत नाही, ही गोष्ट कऱ्हाडकरांना न पटणारी आहे. आता कोरोनाची दुसरी लाट वाढलेली असताना अजूनही रुग्णवाहिका खरेदी झालेली नाही, ही बाब दप्तर दिरंगाई म्हणायची की राजकारण म्हणायचे? त्याही पुढे जाऊन हे दप्तर दिरंगाईचं राजकारण आहे असं म्हणायचं? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पृथ्वीराज चव्हाण व पालिकेतील सत्ताधारी आघाडी यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे हा निधी कोणासाठी तरी अडसर ठरत असल्याची चर्चाही पालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे.
चौकट :
ते नगरसेवक काय करत आहेत ..
कऱ्हाड पालिकेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी बहुमताने निवडून आली. पण निकालानंतर काही दिवसातच त्यातील बहुतांश नगरसेवकांनी चव्हाणांकडे पाठ फिरवली. तरीही पालिकेत चार-पाच नगरसेवक आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानतो, असे सांगतात. पण बसताना ते वेगवेगळे बसलेले दिसतात. मग आमदार चव्हाण यांनी दिलेल्या निधीतून अजूनही रुग्णवाहिका खरेदी केलेली नाही, ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही का? त्यांनी याबाबत काय पाठपुरावा केला? हा सुद्धा प्रश्न आहे.
कोट
कऱ्हाड पालिकेकडे मुळातच एक रुग्णवाहिका आहे. काही महिन्यांपूर्वीच पालिकेने ती खरेदी केली आहे. त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी कमिशनर यांची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी घेण्यात बराच वेळ गेला. आता ती परवानगी पालिकेला मिळाली आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधीतून पालिका दुसरी रुग्णवाहिका खरेदी करणार असून, त्यासाठी ऑर्डर दिलेली आहे.
- रमाकांत डाके
मुख्याधिकारी, कऱ्हाड