पतसंस्था बुडविणारे बॅँक काय चालविणार?

By Admin | Updated: April 30, 2015 00:26 IST2015-04-29T23:22:21+5:302015-04-30T00:26:09+5:30

जावळी बॅँक निवडणूक : बिभवीतील सभासद मेळाव्यात कदमांचा मानकुमरेंना टोला

What will the banks of the debt crisis run? | पतसंस्था बुडविणारे बॅँक काय चालविणार?

पतसंस्था बुडविणारे बॅँक काय चालविणार?

कुडाळ : ‘आम्ही भिलारे यांच्या विचारांचेच पाईक आहोत. यापुढेही त्यांचेच नेतृत्व मान्य करणार आहोत. मात्र, वसंतराव मानकुमरेंना आपली स्वत:ची पतसंस्था नीट चालविता आली नाही, ते जावळी बँक काय चालविणार. त्यामुळे त्यांनी कळंबे महाराजांनी उभ्या केलेल्या संस्थेवर दगड मारण्याचे काम करू नये. बँकेचे सभासद मानकुमरे आणि त्यांच्या पिलावळींना बँक निवडणुकीत जागा दाखवतील,’ असा टोला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमित कदम यांनी वसंतराव मानकुमरेंना लगावला. बिभवी, ता. जावळी येथील सभासद मेळाव्यात ते बोलत होते.
जावळी बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी विद्यमान अध्यक्ष योगेश गोळे, ज्येष्ठ संचालक यशवंतराव देशमुख, लक्ष्मण धनावडे, अविनाश कारंजकर, सुरेश दळवी, सुरेश जाधव, विठ्ठल पवार, एकनाथ चौधरी, सागर धनावडे, सुनील देशमुख, जयसिंग चिकणे, महेश देशमुख उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, ‘ज्यांनी नेत्यांच्या विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या, विरोध करणाऱ्या मंडळींचे मानकुमरे सहकार्य घेऊन बँक लढवित आहेत. त्या दीपक पवार, सदाशिव सपकाळांचे सहकार्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते मान्य करणार का? हा मानकुमरेंचा दुटप्पीपणा बँकेसाठी नसून राजकीय स्वार्थासाठीच आहे.
योगेश गोळे म्हणले, ‘संस्था चालविण्याची धमक असावी लागते. मुंबईतही आम्ही मोठे उद्योजक ठेवीदार म्हणून आणले. त्यांनीही जावळी बँकेवर विश्वास ठेवला. कामकाजाचे कौतुक केले; परंतु आज विरोधक बँकेच्या कामकाजाव्यतिरिक्त वैयक्तिक टीका करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’
मेळाव्यास दक्षिण भाग, केळघर, मोरावळे, बिभवी, मेढा परिसरातील जवळपास पाचशे सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मानकुमरेंना होयबा संचालक हवेत
‘बँक चांगली चालली आहे. ठेवीदारांच्या ठेवींमुळे बँकेची प्रगती होत आहे. मात्र, स्वत:च्या मनमानीने बँक चालवण्यासाठी मानकुमरेंना ‘होयबा’ संचालक हवे आहेत. म्हणजे, हवी तशी बँक मोडून खाता येईल. मात्र, याला आमचा परखड विरोध राहील, ही संस्था कष्टकऱ्यांची आहे. कष्टकरी, माथाडी आमच्यासोबतच आहेत,’ असा विश्वास गोळेंनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: What will the banks of the debt crisis run?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.