मोबाइल बिघडला म्हणून काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:24+5:302021-06-09T04:47:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. ...

मोबाइल बिघडला म्हणून काय
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात संचारबंदी अंशत: शिथिल झाली आणि अत्यावश्यक सेवेची दुकाने पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र, मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असली तरी अनेक दुकानदार लपूनछपून ही कामे करीत आहेत. अशा दुकानांच्या आवारात नागरिक सर्व नियम पायदळी तुडवून गर्दी करीत आहेत. मोबाइल बिघडला म्हणून काय झालं, आरोग्य बिघडायला नको, असं म्हणण्याची वेळ या नागरिकांना पाहून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका जसा इतर उद्योग-व्यवसायांना बसला, तसाच तो मोबाइल व्यावसायिकांना देखील बसला आहे. तब्बल दीड महिन्यापासून मोबाइल दुरुस्तीची दुकाने बंद असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. कोणाचा स्पीकर खराब झाला आहे तर कोणाचा डिस्प्ले फुटला आहे. अशा अडचणी वाढत चालल्या असताना मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अद्यापही बंद आहेत.
संचारबंदी शिथिल झाली तरी मोबाइल दुरुस्तीची दुकाने मात्र अजूनही बंद आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लपूनछपून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. अशा दुकानांच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी होत आहे. एक वेळ मोबाइल बिघडला तरी चालेल; परंतु आपले आरोग्य बिघडता कामा नये, याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलची दुकाने आज ना उद्या उघडतील; परंतु आपलं आरोग्य बिघडले तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.
(चौकट)
ही आहेत कारणे
- मोबाइलचा स्पीकर खराब होणे. त्यामुळे ध्वनी प्रतिध्वनी ऐकू न येणे
- डिस्प्ले फुटणे. ज्यांचे टचस्क्रीन मोबाइल आहेत त्यांचे कीपॅड न चालणे
- वारंवार चार्जिंग करूनही मोबाइल चार्ज न होणे
- मोबाइलचा व्हॉल्युम कमी-जास्त करण्याची बटणे नादुरुस्त होणे
- मोबाइलची नवीन बॅटरी टाकणे व नवीन सीम खरेदी करणे, रिचार्ज करणे.
(चौकट)
दीड महिन्यापासून बाजारपेठ बंद
सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा घरपोच उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे मोबाइलसह इतर सर्व दुकाने गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने छोट्या-मोठ्या दुकानदारांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्हा प्रशासनाने टप्प्याटप्प्याने संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून दुकाने खुली करावीत, अशी मागणी दुकानदार करीत आहेत.
(कोट)
शटर उघडण्याची प्रतीक्षा
कोरोनाचा सर्वात मोठा फटका आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांना बसला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मोबाइल रिपेरिंग दुकाने बंद आहेत. त्यामुळे आमची रोजीरोटी बंद झाली आहे. दुकानांचे शटर कधी उघडेल, हीच ओढ लागली आहे.
- प्रकाश जाधव, सातारा
(कोट)
दुकान चालले तरच घर चालते; परंतु गेल्या दीड महिन्यापासून सर्व काही बंद आहे. मोबाइल दुरुस्तीची कामे पूर्णत: बंद झाली आहेत. जोपर्यंत दुकान सुरू होत नाही, तोपर्यंत आमची गाडी रुळावर येणार नाही.
- प्रमोद कदम, सातारा
मोबाइल महत्त्वाचाच.. पण आरोग्य?
(कोट)
मोबाइलमुळे आप्तस्वकीयांशी संपर्क साधता येतो. व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते; परंतु मोबाइल खराब झाल्यास हे सर्व बंद झाले होते. आरोग्य महत्त्वाचे आहेच; परंतु सध्याच्या घडीला मोबाइल देखील महत्त्वाचा आहे.
- विशाल उतेकर
(कोट)
आम्ही आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन घराबाहेर पडत आहोत. गेल्या महिनाभरापासून मोबाइल बंद आहे. तो दुरुस्त झाल्यास किमान नातेवाइकांशी संपर्क तरी करता येईल.
- नागेश कारंडे, सातारा