वाट कसली पाहता... लसीकरणासाठी महाविद्यालये ताब्यात घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:18+5:302021-05-05T05:03:18+5:30
प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा शहरात लसीकरणाच्या निमित्ताने होणारी ...

वाट कसली पाहता... लसीकरणासाठी महाविद्यालये ताब्यात घ्या!
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा शहरात लसीकरणाच्या निमित्ताने होणारी गर्दी रुग्णांच्या संख्येत भर टाकू शकते, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी शहरासह महामार्गावरील महाविद्यालये ताब्यात घेऊन लसीकरण केंद्रांचे विकेंद्रीकरण केल्यास गर्दीही टळेल आणि रणरणत्या उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्रच आता लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतही हे लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यासाठी तोबा गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविणेही यंत्रणांना कठीण गेले. पू. कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात तर ही गर्दी आणि त्यातून होणारी वशिलेबाजी रोखण्यासाठी एकवेळ पोलीस बंदोबस्त बोलाविण्याची वेळ वेद्यकीय अधिकाऱ्यांवर आली होती. लांबच्या लांब रांगेत, उन्हात उभे राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहन होईना आणि सांगताही येईना अशी स्थिती झाली होती.
आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्यामुळे या लसीकरण केंद्रांवर गर्दीचा महापूर लोटण्याचा धोका आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नंबर लावणे बंधनकारक असले तरीही अनेकांना ते करता येत नसल्याचे कारण पुढे करून लसीकरणाला त्यांची गर्दी होणार आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय, कस्तुरबा गांधी रुग्णालय आणि गोडोली आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी सध्या लसीकरणाची सोय आहे. एकीकडे लॉकडाऊन, संचारबंदीचे निर्बंध, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असताना उपनगरांतून शहरात या रुग्णालयांपर्यंत येणे ज्येष्ठांना त्रासदायक ठरतेय. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या जवळच्याच ठिकाणी ही सोय उपलब्ध करून दिली तर ज्येष्ठांचा त्रास आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास साहाय्यभूत ठरेल, असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले.
चौकट :
शहरात गुरुवार पेठ, गोडोली, प्रतापगंज पेठ यासह महामार्गावरही महाविद्यालये आहेत. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने ही सर्व महाविद्यालये बंद आहेत. लसीकरणासाठी ही महाविद्यालये ताब्यात घेऊन तेथे सोय केल्यास प्रशस्त जागा उपलब्ध होईल. सामाजिक अंतर पाळता येइल. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना वर्गखोल्यांतील बेंच बसण्यासाठी देता येतील. सावली, पिण्याचे पाणीही मिळेल. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि गोडोली आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सोय असली तरीही ती अपुरी व गरसोईची आहे. या ठिकाणी वेद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक पुरविण्याची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांकडे द्यावी.
कोट :
कोविडची दुसरी लाट महाभयंकर ठरत आहे. अशातच विविध आजारांनी ग्रासलेल्या ज्येष्ठांना याची लागण लगेचच होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठांना गर्दीत येण्याचे प्रशासनाने टाळावे. त्याऐवजी काही दिवसांसाठी महाविद्यालये ताब्यात घेतली तर ज्येष्ठांना बाकांवर बसता येईल आणि आपला नंबर आला की लसही घेता येईल.
- प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, ज्येष्ठ नागरिक