‘जललक्ष्मी’मुळे भिजणार वाईचा पश्चिम भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 00:08 IST2015-05-19T23:11:59+5:302015-05-20T00:08:25+5:30
२५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; आता प्रतीक्षा पाण्याची

‘जललक्ष्मी’मुळे भिजणार वाईचा पश्चिम भाग
वाई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिम बलकडी धरण ते पसरणीपर्यंतचे पाईपलाईनचे काम पूर्ण होत असून, ठिकठिकाणी पाणी वाटपाची दारे बसवण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्याच्या शेती पाण्यासाठी आकांक्षा वाढल्या आहेत. पाण्याच्या प्रतीक्षेत या भागातील जनता आहे.
धोम धरणाच्या निर्यातीला चार दशकांहून अधिक काळ झाला आहे. त्यावेळी अनेक गावच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्या आहेत. पश्चिम भागातील काटावरच्या गावांना व उर्वरित शेतीपासून वंचित असणाऱ्या भागाला शेती पाण्यासाठी शासनाकडून जनतेची पाण्याची मागणी होती. ‘जललक्ष्मी’योजनेसाठी व अनेकवेळा प्रयत्न झाले होते. आमदार मकरंद पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करत असताना त्यांनी या योजनेसाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध केला होता. अनेक दिवस येथे पाईप पडून होती; परंतु या वर्षाच्या कालावधीत बलकवडी ते पसरणी हे २५ किलोमीटर अंतराची पाईपलाईन पूर्ण झाली असून, ती शासनाची पूर्व ग्रॅव्हिटीची योजना आहे. त्याच्या पाणी वाटपाच्या दारांची कामे चालू असून, या योजनेतून येणाऱ्या पाण्याच्या प्रतीक्षेत या भागातील शेतकरी आहेत. या योजनेमुळे शेती, पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जललक्ष्मी योजनेस संपूर्ण ४५ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या योजनेच्या पाईपलाईन, पाणी वाटपाची दारे यांचे काम पूर्ण होत असून, बलकवडी धरणातून पाणी सोडून याची लवकरच चाचणी घेणार.
-आमदार मकरंद पाटील
जललक्ष्मी योजनेतून आकोशी-आसगाव-वयगाव- चिखली-मुगाव आणि कुसगाव-पसरणी या भागातील उर्वरित क्षेत्र भिजण्यासाठी शासनामार्फत उपसा-सिंचन योजना करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- सहदेव भणगे, अध्यक्ष, उपसा सिंचन